रूग्णालयात पायदळ नेताना वाटेतच महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:00 AM2019-09-07T00:00:58+5:302019-09-07T00:01:23+5:30
ती व तिची चार वर्षाची मुलगी दोघीच घरी होत्या. याच वार्डातील सुरेश करमे हे पहाटे फिरायला गेले असता, सदर बाब करमे यांच्या लक्षात आली. सुरेश करमे व अर्चना मत्सावार यांनी १०८ रूग्णवाहिकेला जवळपास ५ वाजता फोन केला. मात्र बराच वेळ होऊनही रूग्णवाहिका आली नाही. त्यामुळे सदर माता पायीच एटापल्ली येथील रूग्णालयात पायदळ जाण्यास निघाली. मात्र घरापासून काही दूर जाताच तिची प्रसुती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : १०८ रूग्णवाहिका तब्बल दोन तास उपलब्ध न झाल्याने रूग्णालयात पायदळ जाण्यासाठी निघालेली गरोदर माता वाटेतच प्रसुती झाली. सुदैवाने बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत.
एटापल्ली येथीलच इंदिरा वार्डातील कलावंती टिल्लू गावडे (३२) या महिलेला शुक्रवारी पहाटेपासून प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. त्यावेळी ती व तिची चार वर्षाची मुलगी दोघीच घरी होत्या. याच वार्डातील सुरेश करमे हे पहाटे फिरायला गेले असता, सदर बाब करमे यांच्या लक्षात आली. सुरेश करमे व अर्चना मत्सावार यांनी १०८ रूग्णवाहिकेला जवळपास ५ वाजता फोन केला. मात्र बराच वेळ होऊनही रूग्णवाहिका आली नाही. त्यामुळे सदर माता पायीच एटापल्ली येथील रूग्णालयात पायदळ जाण्यास निघाली. मात्र घरापासून काही दूर जाताच तिची प्रसुती झाली. शेजारी असलेल्या सुनंदा मच्छावार, पुष्पा दोनाडकर, माया उप्पलवार यांनी मदत केली. प्रसुतीनंतर पुन्हा १०८ रूग्णवाहिकेला फोन केला. मात्र रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यानंतर सदर बाब कुणाल मुल्कावार यांनी तोडसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रूग्णवाहिकेला फोन केला. सकाळी ६.१५ वाजता १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका आली. या रूग्णवाहिकेतून महिला व नवजात बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्येच्या तुलनेत रूग्णवाहिकांची संख्या कमी आहे. खासगी वाहनेही कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अतिरिक्त रूग्णवाहिका देण्याची मागणी आहे.
आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष
एटापल्ली येथे ग्रामीण रूग्णालय असले तरी सदर गाव तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. तोडसा पीएचसीअंतर्गत एटापल्ली बरोबरच एटापल्ली टोला, डुम्मे ही गावे येतात. गावात ग्रामीण रूग्णालय असल्याने बहुतांश रूग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र गरोदर मातांकडे लक्ष देण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांची आहे. तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन परिचारिका, दोन आशा वर्कर व एक गट प्रवर्तक आहे. मात्र ते फारसे लक्ष देत नाही. वाटेत प्रसुती झालेल्या महिलेच्या प्रसुतीची दिनांक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिलांना माहित असते. काही दिवसांपूर्वीच तिला रूग्णालयात भरती करणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने सदर मातेवर वाटेतच प्रसुती होण्याची पाळी आली.
तसेच १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून दिली जात असल्याचे शासन व प्रशासन छातीठोकपणे सांगत असले तरी त्यात तथ्य नसल्याचे या घटनेवरून दिसून येते.