जहाल महिला नक्षलवाद्यास दुसऱ्यांदा अटक; अनेक कारवायांमध्ये सहभाग, सहा लाखांचे हाेते बक्षीस
By दिगांबर जवादे | Published: February 26, 2024 07:08 PM2024-02-26T19:08:14+5:302024-02-26T19:09:11+5:30
गडचिराेली पाेलिसांनी विशेष अभियान राबवून छत्तीसगड राज्याच्या सीमेवर राजेश्वरी हिला पुन्हा २५ फेब्रुवारी राेजी अटक केली. तिला अटक झाल्याने माओवादी चळवळीला माेठा हादरा बसला आहे.
गडचिराेली : सहा लाख रूपयांचे बक्षीस असलेल्या एरीया कमिटी मेंबर राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (३०) रा. बडा काकलेर, जिल्हा बिजापूर (छत्तीसगड) या महिला माओवाद्यास पाेलिसांनी २०१९ मध्ये अटक केली हाेती. २०२० मध्ये कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुन्हा माओवादी चळवळीत काम सुरू केले. गडचिराेली पाेलिसांनी विशेष अभियान राबवून छत्तीसगड राज्याच्या सीमेवर राजेश्वरी हिला पुन्हा २५ फेब्रुवारी राेजी अटक केली. तिला अटक झाल्याने माओवादी चळवळीला माेठा हादरा बसला आहे.
फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सीव्ह कॅम्पेन) कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे आदी देशविघातक कृत्य करत असतात. त्यामुळे या कालावधीत गडचिराेली पोलीस दल विशेष सतर्क असते. छत्तीसगड राज्याच्या सीमा परिसरातील जंगलात विशेष माेहीम राबवली जात असताना पाेलिसांनी २५ फेब्रुवारी राेजी राजेश्वरी गोटा हिला अटक केली. राजेश्वरी ही २००६ मध्ये माओवादी चळवळीत सहभागी झाली. २०१०-११ मध्ये उपकमांडर पदावर कार्यरत हाेती. २०१६ मध्ये फरसेगड दलममध्ये बदली होऊन २०१९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.
२०१९ मध्ये छत्तीसगड राज्यातील ताेयनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीत तिचा सहभाग हाेता. याच गुन्ह्यात तिला अटक करण्यात आले हाेते. २०२० मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत ती कार्यरत होती.
सदर कारवाई गडचिराेली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
या चकमकीत हाेता सहभाग
एप्रिल २०२३ मध्ये केडमारा जंगलात पाेलीस व माओवादी यांच्यात चकमक उडाली. यात तीन माओवादी ठार झाले हाेते. या चकमकीत राजेश्वरीचा सहभाग हाेता. तिच्या विराेधात भामरागड पाेलीस स्टेशनमध्ये मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीतही तीचा सहभाग हाेता.