महिला पोलिस अंमलदाराने वैनगंगेच्या पात्रात घेतली उडी; कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 10:34 AM2023-07-01T10:34:44+5:302023-07-01T10:46:45+5:30

या घटनेने खळबळ उडाली असून उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.

Female police officer commits suicide by jumping into Wainganga river; The reason is unclear | महिला पोलिस अंमलदाराने वैनगंगेच्या पात्रात घेतली उडी; कारण अस्पष्ट

महिला पोलिस अंमलदाराने वैनगंगेच्या पात्रात घेतली उडी; कारण अस्पष्ट

googlenewsNext

आरमोरी(गडचिरोली) : अतिदुर्गम भागात कार्यरत एका महिला पोलिस अंमलदाराने वैनगंगा नदीपात्रात उडी घेतल्याची घटना ३० जून रोजी दुपारी ४ वाजता आरमोरी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.

शारदा नामदेव खोब्रागडे (वय ३०) असे त्या महिला अंमलदाराचे नाव आहे. त्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील शारदा खोब्रागडे या नऊ वर्षांपूर्वी पोलिस दलात भरती झाल्या होत्या. त्या अविवाहित असून गडचिरोलीत नातेवाईकांकडे राहत. दरम्यान, १५ दिवसांपासून त्या रजेवर होत्या. ३० जून रोजी त्या स्कूटरवरुन गडचिराेलीहून आपल्या गावी जाते, असे सांगून निघाल्या. आरमोरी जवळील ब्रम्हपुरी रोडवरील वैनगंगा नदीपात्रालगत स्कूटर उभे केले. त्यानंतर नदीपात्रात उडी घेतली. तेथून ये-जा करणाऱ्यांनी ही घटना पाहिली व आरमोरी पोलिसांना कळविले. पो.नि. संदीप मंडलिक व सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. शारदा खोब्रागडे यांचा नदीपात्रात बोटीद्वारे शोध सुरु आहे. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.

मोबाइल, चप्पल स्कूटरजवळ

शारदा खोब्रागडे यांनी हे पाऊल का उचलले, याचे गूढ उकललेले नाही. नदीपात्रात उडी घेण्यापूर्वी त्यांनी स्वत: ची चप्पल व मोबाइल हे साहित्य दुचाकीजवळ ठेवले होते. ते आरमोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शारदा यांचे नातेवाईक आरमोरीत दाखल झाले आहेत.

Web Title: Female police officer commits suicide by jumping into Wainganga river; The reason is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.