महिलांकडून सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:17 AM2018-05-16T01:17:08+5:302018-05-16T01:17:08+5:30
तालुक्यातील बामणी उपपोलीस ठाण्यांतर्गत जाफ्राबाद गावातील परिवर्तन महिला बचत गटाच्या सदस्य व इतर महिलांनी पुढाकार घेऊन १५ मे रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावालगत धाडसत्र राबवून गूळ, मोहाचा सडवा नष्ट केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील बामणी उपपोलीस ठाण्यांतर्गत जाफ्राबाद गावातील परिवर्तन महिला बचत गटाच्या सदस्य व इतर महिलांनी पुढाकार घेऊन १५ मे रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावालगत धाडसत्र राबवून गूळ, मोहाचा सडवा नष्ट केला.
गेल्या काही दिवसांपासून जाफ्राबाद गावात व परिसरात मोहफूल व गुळाच्या दारूची विक्री प्रचंड वाढली होती. परिणामी गावातील सामाजिक वातावरण बिघडले होते. अशा परिस्थितीत महिला बचत गटाच्या सदस्य व गावातील इतर महिलांनी अवैैध दारूविक्रीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बामणीचे प्रभारी पोलीस अधिकारी राहूल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे व इतर कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबविले.
घराघरांत दारू काढण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल साठविण्यात आला होता. गूळ व मोहाचा सडवा नष्ट करून महिलांनी दारूबंदी विरोधात एक पाऊल पुढे टाकले आहे. यावेळी परिवर्तन महिला बचत गटाच्या अध्यक्ष श्रीलता मुडमडगेला, सदस्य स्वाती गंपा, लच्चू मुडमडगेला, अंकू जाडी, लक्ष्मी गग्गुरी व गावातील ५० ते ६० महिला उपस्थित होत्या.
महिलांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे दारूविक्रेत्यांची धाबे चांगलेच दणाणले आहे. सदर कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. दारूविक्रेत्यांच्या विरोधात महिलांचे संघटन वाढून महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिसांनी केले.