१०० शेतकऱ्यांना खताचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:39 PM2019-06-14T22:39:16+5:302019-06-14T22:39:45+5:30
आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ५४ गावातील १०० अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया व इतर खताच्या प्रत्येकी दोन बॅगचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम १४ जून रोजी शुक्रवारला आष्टी पोलीस ठाण्यात घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ५४ गावातील १०० अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया व इतर खताच्या प्रत्येकी दोन बॅगचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम १४ जून रोजी शुक्रवारला आष्टी पोलीस ठाण्यात घेण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद पोलीस स्व.प्रकाश गोंगले यांची आई कारूबाई गोंगले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, गणेश सिंगाडे, पोलीस मित्र आलोक मंडल आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या संकल्पनेतून आष्टी पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मागील महिन्याच्या आपल्या वेतनातून पैसे जमा करून युरिया खत खरेदीसाठी दिले. एका शेतकऱ्याला दोन बॅग खत देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. कारूबाई गोंगले यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खताच्या बॅगचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन केले. शेतीपयोगी माहिती दिली. पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनीही मार्गदर्शन केले. पोलिसांतर्फे या उपक्रमातून अल्पभूधारक शेतकºयांना मदतीचा हात देण्यात आला.