दारूसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:01:07+5:30
अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास एमएच १२ डीई ७४११ क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या येत असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/कुरखेडा/आरमोरी : अहेरीनजीकच्या देलवलमरी मार्गावर सापळा रचून अहेरी पोलिसांनी दारू व वाहन मिळून एकूण पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास केली.
अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास एमएच १२ डीई ७४११ क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या येत असल्याचे दिसून आले. या वाहनाला थांबवून झडती घेतली असता, १ लाख ६० हजार रुपयांचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी चारचाकी वाहन व दारू मिळून २ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक डांगे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक ए.आर.नरोटे, पोलीस हवालदार पेंदाम, नाईक पोलीस शिपाई अलाम यांनी केली. देवलमरी हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पोलिसांची गस्त ठेवणे कठीण होत असते. याचा फायदा घेऊन अनेक दारू तस्कर रात्री दारू वाहतूक करतात.
पाथरगोटा, जोगीसाखरात पोलिसांची कारवाई
आरमोरी पोलिसांनी तालुक्याच्या पाथरगोटा येथील झुडूपी जंगलातून मंगळवारी देशी दारूच्या ७० निपा जप्त केल्या. तसेच जोगीसाखरा मार्गावरून वाहनातून नेण्यात येणारी ५० लीटर मोहफूल दारू जप्त केली. ३५ हजार रुपये किमतीचे दुचाकी वाहन ताब्यात घेतले. पाथरगोटा येथील कारवाईत आरोपी गोकूळदास धोंगडे (३६) रा. जोगीसाखरा व महेश माटे रा.डोंगरगाव यांच्यावर तर दुसºया कारवाईत जगदीश खोबरागडे रा.आरमोरी, नीलेश श्रीकुंठवार व चरण ताडाम रा.जांभळी यांच्यावर गुन्हा दाखल केला.
महिलांनी केला ९० किलो सडवा जप्त
कुरखेडा : तालुक्यातील मोहगाव जंगल परिसरात तीन ठिकाणी धाडी टाकून जप्त करण्यात आलेला ९० किलो मोहसडवा व साहित्य गावसंघटनेच्या महिलांनी नष्ट केला. तळेगाव व वाकडी येथील महिला-पुरुषांनी केलेल्या अहिंसक कृतीमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मोहगाव व तळेगाव येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री केल्या जाते. या दोन्ही गावातील दारूविक्रेते जंगल परिसरात भट्ट्या सुरु करून गावात दारूची विक्री करतात. यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिक दारू पिण्यासाठी या गावांकडे धाव घेतात. याचा त्रास दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. यामुळे तळेगाव व वाकडी येथील गाव संघटनेच्या महिलांनी मोहगाव जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार तीन ठिकाणी धाडी टाकून ९० किलो मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून नष्ट केले.