तीन नगर पंचायतींमध्ये अविरोध तर दोन ठिकाणी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 11:06 AM2022-02-08T11:06:00+5:302022-02-08T11:13:29+5:30

नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सोमवारी पाच नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी नामांकन भरण्यात आले. त्यामध्ये चामोर्शी, एटापल्ली व धानोरात प्रत्येकी एकच नामांकन दाखल झाले.

fight for the presidents post in the nagar panchayats | तीन नगर पंचायतींमध्ये अविरोध तर दोन ठिकाणी चुरस

तीन नगर पंचायतींमध्ये अविरोध तर दोन ठिकाणी चुरस

googlenewsNext
ठळक मुद्देचामोर्शी, एटापल्ली, धानोरात एक तर कुरखेडा, अहेरीत प्रत्येकी दोन नामांकन

गडचिरोली : नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सोमवारी पाच नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी नामांकन भरण्यात आले. त्यामध्ये चामोर्शी, एटापल्ली व धानोरात प्रत्येकी एकच नामांकन दाखल झाले. त्यामुळे या ठिकाणच्या नगराध्यक्षपदाची निवड अविरोध होणार आहे. तर, कुरखेडा व अहेरीत प्रत्येकी दोन नामांकन दाखल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नगराध्यभपदासाठी चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

चामाेर्शीत जयश्री वायलालवार यांचा एकमेव अर्ज

चामोर्शी स्थानिक नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले आहे. काँग्रेसकडून जयश्री वायलालवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड निश्चित झाली आहे. चामाेर्शीत काँग्रेस ०८ जागा, राष्ट्रवादी ०५, भाजप ०३ जागा तर रासप ०१ जागा असे पक्षीय बलाबल आहे. यात काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसला मैत्रीचा हात पुढे करून सहकार्य करीत असल्याची शहरात खमंग चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने जयश्री वायलालवार यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड निश्चित झाली आहे.

धानोरा काॅंग्रेसचा बनणार नगराध्यक्ष

धानोरा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी काॅंग्रेसच्या पौर्णिमा भास्कर सयाम यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्याच नगराध्यक्ष होणार जवळपास निश्चित झाले आहे. सयाम या पहिल्यांदाच निवडून आल्या. नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला करीता आरक्षित आहे. धानाेरात काॅंग्रेसचे एकूण १३ सदस्य निवडून आले आहेत. भाजपचे ३ तर १ अपक्ष नगरसेवक आहेत. त्यामुळे काॅंग्रेसचाच नगराध्यक्ष बनणार हे निश्चित होते. परंतु काॅंग्रेसकडे अनुसूचित जमातीच्या तीन महिला उमेदवार हाेत्या. हे तिन्ही नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी इच्छुक हाेते परंतु सयाम याना नगराध्यक्षपदाची लाॅटरी लागली आहे.

एटापल्ली नगर पंचायतीत दीपयंती पेन्दाम यांना दुसऱ्यांदा संधी

एटापल्ली : सर्वाधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसकडून दीपयंती पेन्दाम यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाला आहे. त्यांना दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे.

एटापल्लीत काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३, भाजपा ३, आवीसं २, अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. आ. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री विजय वड्डेटीवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्यात नागपूर येथे बैठक झाली. बैठकीत महाविकास आघाडीची सत्ता बसविण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे; परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांचे या आघाडीबाबत एकमत झाले नव्हते. ही निवडणूक काँग्रेसने स्वतंत्र तर राकाॅ व शिवसेनेने आघाडी करून लढविली हाेती. माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजगोपाल सुल्वावार यांचे पुत्र राघवेंद्र सुल्वावार हे युवा सेनेचे पदाधिकारी असताना त्यांना शिवसेनेने तिकीट दिले नव्हेत. राघवेंद्र हे अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी नागपूरला दोन नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता काँग्रेस, आवीस, शिवसेना, अपक्ष यांच्यात युती झाल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके यांनी लोकमतला दिली. उपाध्यक्ष पदाकरिता राकाॅचे नगरसेवक जितेंद्र टिकले यांनी लाॅबी लावली आहे. नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला असला तरी उपाध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

कुरखेडात गिरडकर व बोरकर यांचे नामांकन

कूरखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अल्का गिरडकर यांनी तर शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या अनिता बोरकर यांनी नामांकन दाखल केले आहे. नगरपंचायतचा सार्वत्रिक निवडणुकीत ९ जागांसह भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर शिवसेना-काँग्रेस आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित आहे. याकरिता भाजपकडून नवनिर्वाचित चार महिला दावेदार होत्या. त्यांचे एकमत करण्याकरिता पक्षाला तारेवरची कसरत करावी लागली, अशी माहिती आहे. 

अल्का गिरडकर यांचे नामांकन सादर करतेवेळी आमदार यांच्यासह भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित हाेते. मात्र, यावेळी भाजपच्या दुर्गा गाेटेफाेडे व माजी प्रभारी नगराध्याक्ष रवींद्र गोटेफोडे हे उपस्थित नव्हते. भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही येथील परिस्थितीवर भाष्य करणे अवघड झाले आहे. दोन्ही गटांत फक्त एका जागेचे अंतर असल्याने, आघाडीचे समीकरण भाजपच्या नगरसेवकांच्या अंतर्गत रुसव्या-फुगव्यांवर अवलंबून आहे.

अहेरीत भाजप व आविसंत चुरस

अहेरी नगरपंचायतचे नगराध्यपद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहे. साेमवारी भाजपतर्फे सुनीता किशोर मंथनवार तर आविसंकडून रोजा शंकर करपेत यांनी नामांकन दाखल केल्याने १४ तारखेला होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकातील चुरस वाढवली आहे. अहेरीत नगरपंचायतीत भाजप ६, राष्ट्रवादी ३ आविसं ५, शिवसेना २ व अपक्ष १ उमेदवार निवडून आले आहेत. बहुमत कोणत्याच पक्षाला नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी विविध समीकरण जाेडून बघितले जात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख निश्चित झाली तरी कोणकोणासोबत जाईल हे पक्के झाले नाही. त्यामुळे काेण बाजी मारून सत्तेवर बसेल आणि कोण बाहेर होईल याच्याकडे राजनगरीचे लक्ष लागले आहे.

चार ठिकाणी ८ ला नामांकन

कोरची, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा या चार नगर पंचायतींमध्ये ८ फेब्रुवारी रोजी नामांकन सादर केले जाणार आहेत. या नगर पंचायतींमध्ये १५ ला नगराध्यक्षांची निवड होणार आहे.

Web Title: fight for the presidents post in the nagar panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.