शेतात काम करत असताना समोर उभा ठाकला वाघ, महिलांनी प्रसंगावधान राखत विळा भिरकावला आणि जीव वाचवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:58 PM2021-11-22T22:58:52+5:302021-11-22T22:59:12+5:30

Gadchiroli News: गडचिरोली विभागांतर्गत आणि चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका हिम्मतवान महिलेने वाघाशी झुंज दिली. तिच्या मदतीला इतर मजूर महिला धावून आल्या आणि या महिलांनी वाघाचा हल्ला परतवून लावत स्वत:चा जीव वाचवला.

Fighting bravely, the women farm laborers repulsed the tiger's attack | शेतात काम करत असताना समोर उभा ठाकला वाघ, महिलांनी प्रसंगावधान राखत विळा भिरकावला आणि जीव वाचवला

शेतात काम करत असताना समोर उभा ठाकला वाघ, महिलांनी प्रसंगावधान राखत विळा भिरकावला आणि जीव वाचवला

Next

गडचिरोली - गडचिरोली विभागांतर्गत आणि चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका हिम्मतवान महिलेने वाघाशी झुंज दिली. तिच्या मदतीला इतर मजूर महिला धावून आल्या आणि या महिलांनी वाघाचा हल्ला परतवून लावत स्वत:चा जीव वाचवला. ही घटना जोगना उपक्षेत्रातील मुरमुरी जंगलाजवळच्या शेतात घडली. दुसरीकडे भाडभिडी जंगल परिसरात एका गुराख्यासमोर वाघ येऊन उभा ठाकला. त्याने पळ काढत आणि इतर लोकांनी काठ्या घेऊन आरडाओरड केल्याने तोसुद्धा वाघाच्या तावडीतून बचावला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सरिता देवाजी चहाकाटे रा.मुरमुरी ही महिला गावातील इतर महिलांसोबत जंगलालगत असलेल्या शेतशिवारात धानपिक कापण्यासाठी गेली होती. धानाच्या कडपा कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर समोरासमोर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने न घाबरता हातात असलेली धानकाती (विळा) वाघाच्या दिशेला भिरकावून आरडाओरड केली. त्यामुळे जवळपास असलेल्या इतरही महिलांनी आरडाओरड करत तिच्या मदतीसाठी धाव घेतली. अखेर वाघाला माघार घेऊन पळ काढावा लागला. ही घटना दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान घडली. वनविभागाचे क्षेत्र सहायक विवेकानंद चांदेकर यांनी पंचनामा केला असता त्या ठिकाणी वाघाचे ठसे आढळून आले.

दुसऱ्या घटनेत भाडभिडी येथील नारायण नैताम हा गुरे घेऊन जंगलात गेला असता, गुरे पांगवत असताना समोरच वाघ बसलेला दिसला. त्याला पाहताच नारायण याने आरडाओरड करत तेथून पोबारा केला. हे पाहून इतर गुराखी काठ्या घेऊन आरडाओरड करीत वाघाच्या दिशेने धावले. त्यामुळे वाघ पळून गेला. ही घटना जोगना जंगल परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान कुथेगाव येथील एका दुचाकी चालकालाही रस्त्यावरच वाघ दिसल्यामुळे त्याला दुचाकीसह माघारी फिरावे लागले. जंगलात वेळी अवेळी फिरणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

Web Title: Fighting bravely, the women farm laborers repulsed the tiger's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.