धार्मिक मिरवणूक काढणाऱ्याविराेधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:43 AM2021-03-01T04:43:21+5:302021-03-01T04:43:21+5:30
विष्णू हिरालाल तक्तानी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तक्तानी यांच्या नवीन घराच्या वास्तुपूजनाचा कार्यक्रम शनिवारी आयाेजित करण्यात ...
विष्णू हिरालाल तक्तानी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तक्तानी यांच्या नवीन घराच्या वास्तुपूजनाचा कार्यक्रम शनिवारी आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमानिमित्त तक्तानी यांनी सायंकाळी कुरखेडा-देसाईगंज मार्गावर फवारा चौक ते त्यांच्या नवीन घरापर्यंत डीजे वाजवत मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. या मिरवणुकीत जवळपास २५० नागरिक सहभागी झाले हाेते. शनिवारी कुरखेडा येथे आठवडी बाजार असल्याने काही काळ ट्रॅफिकही जाम झाली होती. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे शहरवासीयांत मोठा असंतोष पसरला. यापूर्वी शहरात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रेला कोरोनाचे कारण देत प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे या मिरवणुकीसंदर्भात काही नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेकडे भ्रमणध्वनीद्वारे तक्रार नोंदवत जाब विचारला. यानंतर प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागे होत तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या तक्रारीवरून विष्णू तक्तानी यांच्या विरोधात कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता १८६० कलम १९८,२६९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (३)१३५, साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ कलम २,३,४ अन्वये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.