गैरव्यवहारातील दोषींवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:42 PM2017-11-06T22:42:55+5:302017-11-06T22:43:06+5:30

कोरची तालुक्यातील कोचिनारा येथे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांनी संगणमत करून घरकूल घोटाळा केला असल्याचे तपासात सिध्द झाले आहे.

File Criminal Code for Criminal Offenses | गैरव्यवहारातील दोषींवर गुन्हे दाखल करा

गैरव्यवहारातील दोषींवर गुन्हे दाखल करा

Next
ठळक मुद्देकोचिनारात घरकूल घोटाळा : गावकºयांची पत्रकार परिषदेत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरची तालुक्यातील कोचिनारा येथे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांनी संगणमत करून घरकूल घोटाळा केला असल्याचे तपासात सिध्द झाले आहे. या प्रकरणी ग्रामसेवकास निलंबितही करण्यात आले आहे. त्यांनी शासनाच्या पैशाचा गैरवापर केल्याने तिघांवरही फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी कोचिनारा येथील इंदूलाल सहारे व नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी घरकूल मंजूर झाले होते. त्यांच्या घरकुलाची रक्कम परस्पर काढून रकमेची अफरातफर केली. एकाच लाभार्थ्याला दोनवेळा घरकूल मंजूर केले. घरकुलाचे काम अपूर्ण असतानाही पूर्ण रकमेची उचल केली. या संदर्भात कोचिनारा येथील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. चक्काजाम आंदोलने सुध्दा केली. त्यानंतर पाच सदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली असता, या चौकशीमध्ये तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच दोषी आढळून आले. चौकशीच्या अहवालानंतर ग्रामसेवक एम. एम. मानवटकर यांना निलंबित सुध्दा करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई पुरेशी नसून त्यांनी शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार केला आहे. शासनाला लाखो रूपयांचा चूना लावला आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार असून संबंधित ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सुध्दा दिले आहे. पत्रकार परिषदेला कांताराम जमकातन, पं.स. सदस्य सुशिला जमकातन, बुधराम सहारे, वसंत कॅरीभत्ता, उर्मिला बढईबंस, रघुराम देवान उपस्थित होते.

Web Title: File Criminal Code for Criminal Offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.