आरमोरीचे ठाणेदार व बीट जमादारावर गुन्हा दाखल करा
By admin | Published: October 7, 2016 01:37 AM2016-10-07T01:37:00+5:302016-10-07T01:37:00+5:30
आरमोरी तालुक्याच्या वैैरागड येथील शुभम राऊत व रूपेश राऊत यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार राजेश राऊत यांनी
पत्रपरिषद : शिवसेनेची मागणी; पीडित कुटुंबाचा उपोषणाचा इशारा
गडचिरोली : आरमोरी तालुक्याच्या वैैरागड येथील शुभम राऊत व रूपेश राऊत यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार राजेश राऊत यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी रूपेशचे नाव असताना रितेशला अटक केली. रितेशला न्यायालयातून जामिनावर सुटका करून घ्यावी लागली. वास्तविक राजेश राऊतने स्वत:वर जखमा करून व अंगावरील कपडे फाडून प्राणघातक हल्ला झाल्याचा देखावा केला होता तरी सुद्धा कुठलीही चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे आता ठाणेदार आणि बीट जमादारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हरिष मने व अन्यायग्रस्त कुटुंबाने आरमोरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
राजेश राऊत याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत रितेशचे नाव नसताना देखील तसेच मोका चौकशी न करता रितेशला अटक करण्यात आली व मागील दीड महिन्यापासून त्याला प्रत्येक सोमवारी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागले. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे अन्यायग्रस्त कुटुंबाने आपल्यावरील अन्यायाचे निराकरण व्हावे, ठाणेदार व बिट जमादारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली, अन्यथा कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला.
आरमोरी शहरात मोठ्या प्रमाणावर दारू, सट्टा, जुगार, कोंबडा बाजार आदी अवैैध धंदे दिवसाढवळ्या केले जात आहेत. अवैैध व्यावसायिकांना कोणाचाही धाक राहिला नाही. शहरात घरफोड्या वाढल्या असून पोलिसांनी अद्यापही एकाही गुन्हेगाराला पकडले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने यांनी पत्रकार परिषदेतून दिला. पत्रकार परिषदेला जि. प. सदस्य लक्ष्मी मने, पं. स. सदस्य नानू चुधरी, राजू अंबानी, प्रेमनाथ बेहरे, विजय खरवडे, कल्पना तिजारे, अन्यायग्रस्त राऊत कुटुंब रितेश राऊत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी कारवाई सुरू आहे. ज्या व्यक्तींनी आपल्यावर आरोप केले ते आरोप सूडबुद्धीने करण्यात आले आहेत. या प्रकरणात कारवाईतूनच पोलिसांची भूमिका स्पष्ट होईल.
- महेश पाटील, ठाणेदार, आरमोरी