स्वच्छतेवर भर द्या
By admin | Published: November 6, 2014 10:54 PM2014-11-06T22:54:01+5:302014-11-06T22:54:01+5:30
सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा,
आढावा बैठक : राज्यपालांचे निर्देश
गडचिरोली : सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यपालांचे प्रधान सचिव उमेशचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती राज्यपालांना दिली. जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये टॅक्सी वाटप, अगरबत्ती प्रकल्प, कौशल्यावर आधारित रोजगार, हस्तकला प्रशिक्षण या उपक्रमांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
वनहक्क दाव्यात जिल्हा राज्यात पहिला असून आतापर्यंत ३० हजार ४८८ वैयक्तिक दावे निकाली काढण्यात आले, अशी माहितीही राज्यपालांना देण्यात आली. तसेच ७५० महिलांना घरबसल्या रोजगार अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. राज्यपालांनी कृषी सिंचनावर भर द्या, अशी सूचना करून जिल्ह्यातील प्रलंबित सिंचनाची प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. बैठकीचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी केले.