तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:39+5:302021-05-31T04:26:39+5:30

काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना ...

Fill the vacancies in the tehsil office | तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

Next

काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने ती योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.

पंचायत समितीला निधी द्या

चामाेर्शी : ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून पंचायत समितीला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने पंचायत समितीचे महत्त्व कमी झाले आहे. गावातील याेजनांसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी होत आहे.

पाणीपुरवठा योजनांची कामे थंड बस्त्यात

कुरखेडा : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, मध्यंतरी निधीच मिळाला नसल्याने अनेक योजनांचे काम बंद पडले आहे, तर काही कामे कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे थांबली आहेत. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे त्वरित मार्गी लावावीत.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

भामरागड : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

कार्यालयांमधील थम्ब मशीन सुरू करा

काेरची : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम्ब मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम्ब मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.

प्रसूतिगृह निर्मितीचे बांधकाम रखडले

एटापल्ली : तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यातील काही उपकेंद्रांतील प्रसूतिगृहांचे बांधकाम रखडले आहे. संस्थेअंतर्गत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी हे बांधकाम होणे गरजेचे आहे. प्रसूतिगृहाअभावी अनेक प्रसूती घरीच हाेतात.

दिभना मार्गाचे रुंदीकरण करा

गडचिरोली : वनविभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव

अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांत फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरात नाल्यांचा उपसाही नियमित हाेत नाही.

माहिती केंद्र निर्माण करण्याची मागणी

काेरची : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून हाेत आहे.

ग्राहकांना मिळते बनावट बिल

गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लिकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत.

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे

अहेरी : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तींकडून करण्यात येत आहे.

हागणदारी मुक्तीवर प्रश्नचिन्ह

देसाईगंज : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. घरी शाैचालय असूनही ग्रामीण भागातील वयाेवृद्ध, जुन्या विचाराचे लाेक बाहेर शाैचास जात आहेत.

बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच

चामाेर्शी : तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला. लाेकप्रतिनिधींनी बसस्थानक उभारू, अशी ग्वाही दिली. अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने नाराजी आहे.

कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे

अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबाकाका माती कला बोर्डाची स्थापना करावी. कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा. मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी. वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अटी रद्द कराव्यात. कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळाऊ लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.

रेडियमअभावी अपघाताची शक्यता

कुरखेडा : जिल्ह्यातील अनेक वळणरस्त्यांवर रेडियम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. माेठा अपघात हाेऊ नये, यासाठी रेडियमच्या पट्ट्या लावाव्यात.

Web Title: Fill the vacancies in the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.