कुरखेडा तालुक्यात होणार चित्रपटाचे चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:57+5:302021-02-11T04:38:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : झाडीपट्टी रंगभूमीसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही मराठी चित्रपटांचेही शूटिंग झाले आहे. आता अनेक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : झाडीपट्टी रंगभूमीसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही मराठी चित्रपटांचेही शूटिंग झाले आहे. आता अनेक वर्षांनंतर आणखी एक चित्रपट तयार होऊ घातला असून, त्याच्या शूटिंगसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक व काही कलावंतांनी कुरखेडा तालुक्यातील गुरनाेली परिसराला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी ‘निबंध’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कुरखेडा तालुक्यातील अनेक ठिकाणे नैसर्गिक साैंदर्याने नटली आहेत. या नैसर्गिक साैंदर्याने मुंबईच्या कलावंतांना नेहमीच भुरळ घातली आहे. चित्रपट दिग्दर्शक संजीव माेरे, कलावंत देवेंद्र दाेडके, प्रा.डाॅ.शेखर डाेंगरे, स्थानिक कलावंत किरपाल सयाम यांनी गुरनाेली गावाचा परिसर, शासकीय विश्रामगृह व पाेलीस स्टेशनला भेट देऊन साेईसुविधांची पाहणी केली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांची भेट घेऊन चित्रीकरणाच्या दरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले.
देसाईगंज येथे झाडीपट्टी रंगभूमी आहे. या रंगभूमीतील शेकडाे कलावंत नाटकात काम करतात. हे कलावंत चित्रपटातही काम करू शकतात. त्यामुळे यातील काही कलावंतांना या चित्रपटात घेतले जाईल, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली. ‘निबंध’ हा चित्रपट सामाजिक विषयावर असून, तीन लहान मुलांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती दिग्दर्शकांनी दिली.
बाॅक्स....
लाल सलाम व डाॅ.प्रकाश बाबा आमटे नंतर आता ‘निबंध’
भामरागड तालुक्यात यापूर्वी लाल सलाम व डाॅ.प्रकाश बाबा आमटे या दाेन चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. ‘लाल सलाम’ हा हिंदी चित्रपट असून, नक्षलवाद व स्थानिक आदिवासींच्या जीवनावर तो आधारित आहे. हेमलकसा येथील लाेकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डाॅ.प्रकाश आमटे यांच्या जीवनावरही मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रपटात डाॅ.प्रकाश आमटे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केली, तर डाॅ.मंदाकिनी आमटे यांची भूमिका साेनाली कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर, आता ‘निबंध’ नावाचा चित्रपट तयार झाल्यास लॉकडाऊनच्या काळात अवकळा आलेल्या झाडीपट्टी कलावंतांच्या आशा पुन्हा पल्लवित होतील.