अखेर संतप्त बोरीवासीयांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:36 AM2021-02-13T04:36:27+5:302021-02-13T04:36:27+5:30
ग्रामसेवक व सरपंचाला विकासकामांचा वारंवार हिशेब मागितला, परंतु ते न मिळाल्याने दि.१३ला होणाऱ्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीला नागरिकांनी विरोध ...
ग्रामसेवक व सरपंचाला विकासकामांचा वारंवार हिशेब मागितला, परंतु ते न मिळाल्याने दि.१३ला होणाऱ्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीला नागरिकांनी विरोध दर्शवित बहिष्कार घातला आहे.
सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय योजनांमधून विविध कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या कामांचा जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीने नागरिकपुढे ठेवल्या शिवाय सरपंच पदाची निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगार यांना दि. ९ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले होते. निवेदनात म्हटले की, छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील कंपनीतर्फे पोल्ट्री फार्मचे बांधकाम कोट्यवधी रुपयांतून बोरी येथे सुरू आहे. ग्रामपंचायतीने संबंधित ग्रुपला गुप्तपणे नाहरकत प्रमाणपत्र दिले तसेच पाणीपुरवठाअंतर्गत येणाऱ्या सन २०१९-२० मध्ये झालेल्या पाइपलाइनचे काम करण्यात आले, मात्र गावातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात आले मात्र ते खड्डे लागवडीअभावी ‘जैसे थे’ राहिले. या संपूर्ण झालेल्या कामाचा हिशेब मिळत नाही तेव्हापर्यंत सरपंचाची निवडणुक हाेऊ देणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते.
मात्र आज होत असलेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीसाठी पोलिसांनी सकाळी बोरी ग्रामपंचायतला चोख बंदोबस्त ठेवला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण नागरिक समजण्यास तयार नव्हते. यानंतर दहा वाजताच्या सुमारास कोरची येथील तहसीलदार छगनलाल भंडारी, नायब तहसीलदार रेखा बोक्के व पटवारी, कोतवाल कर्मचारी यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला झालेल्या सर्वच कामाचा हिशेब १८ तारखेच्या चौकशीत नक्की देणार, पण निवडणूक होऊ द्या, असे आश्वासन दिले. परंतु येथील नागरिकांनी ते मान्य केले नाही.
यानंतर अधिकारी परतले तहसीलदार उद्या आम्ही परत येणार आणि निवडणूक घेणार आपली समस्या सोडवणार, असे येथील नागरिकांना सांगितले. यानंतर कोरची पंचायत समिती सवर्ग विकास अधिकारी देवीदास देवरे, विस्तार अधिकारी राजेश फाये ग्रामपंचायतस्थळी आले. तक्रारदार व नागरिकांना पत्र दिले तसेच मागील पंचवार्षिकमध्ये असलेल्या ग्रामपंचायत बॉडीला पत्र दिले आहे व त्यांनी गावकऱ्यांना म्हणाले, की दिनांक १८ फेब्रुवारीला ग्रामपंचायत बोरी येथे भेट देणार आहोत. यावेळी आपण स्वतः ग्रामपंचायत बोरी येथे ११ वाजता संपूर्ण ग्रामपंचायतीचे स्तरावर उपस्थित रहावे याबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल या तारखेस आपण गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून आपल्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असे पत्रातून सांगितले. ग्रामपंचायतच्या ठिकाणी दिवसभर ठिय्या मारून बसलेले गावकऱ्यांनी सायंकाळ झाल्यानंतर घरी परतले आहेत.