अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:05 PM2020-05-20T17:05:17+5:302020-05-20T17:06:52+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या. नागपूर बोर्डाचे अधीक्षक व लिपिकांसह मदतनीस आणि वाहनचालकाला कोरोनाच्या संचारबंदीमुळे गडचिरोलीत येताना काही अडथळेही निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पोहोचायला एक ते दीड तास उशिर झाला.
इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी व्हॅल्युअरने केल्यानंतर त्या उत्तरपत्रिका समीक्षकांकडे पोहोचल्या. मात्र कोरोनाच्या संचारबंदीने रेडझोन असलेल्या नागपूर येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात समीक्षकांना तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचविता आल्या नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून उत्तरपत्रिका समीक्षकांकडेच पडून होत्या. दरम्यान शिक्षण मंडळाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम होत असल्याचे कळविले.
नागपूर हे कोरोनाबाबत रेड झोनमध्ये असल्याने तेथून येणाऱ्या वाहनांची आरमोरीपलिकडे वैनगंगा नदी सीमेवरील पोलीस चौकीवर कसून तपासणी केली जात आहे. अशीच तपासणी नागपूर बोर्डाकडून आलेल्या चार वाहनांचीही करण्यात आली. वाहने अडविल्यानंतर बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली. शिक्षणाधिकारी आर.पी. निकम व उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मध्यस्थीने पोलिसांमार्फत बोर्डाचे चारही वाहन जिल्ह्यात सोडण्यात आले.