अखेर आरमोरी झाली नगर परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:26 AM2017-09-14T00:26:47+5:302017-09-14T00:27:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केली. त्यामुळे आरमोरीकरांची नगर परिषदेची प्रतीक्षाही संपली असून यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आरमोरीवासीयांनी नगर परिषदेची मागणी केली होती. विशेषत: सहकार व भाजप नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनीही बळ दिले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे कार्यकर्त्याकरवी जनहित याचिकाही दाखल केली होती. ती निकाली काढताना न्यायालयाने चार आठवड्यात यावर राज्य सरकारने निर्णय द्यावा, असे निर्देश दिले होते. त्या निर्देशाचा आदर करीत राज्य शासनाने आरमोरीला अखेर नगर परिषदेचा दर्जा दिला.
२०१५ मध्ये राज्य शासनाने तालुकास्तरावरील गावांना ग्रामीण क्षेत्रातून वगळून नागरी क्षेत्रात समाविष्ट केले व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला. मात्र नगर पंचायतीवर आरमोरीकर नाराज होते. आरमोरी ग्रामपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती.
यासंदर्भात माजी उपसरपंच दीपक निंबेकार, हैदरभाई पंजवानी, श्रीहरी कोपुलवार, जागोबा खेडकर, भाग्यवान दिवटे, महेश बांते आदींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. अरविंद सावकार यांनी ताकद लावून सरकारदरबारीही आपले वजन वापरले. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांनीही प्रयत्नात भर पाडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद पोरेड्डीवार यांच्या मागणीला अनुकूलता दाखवून नगर परिषदेच्या निर्णयाला हिरवी झेंडी दिल्यामुळे आरमोरीवासीयांसाठी गोड बातमी मिळणार अशी माहिती पंधरवड्यापूर्वीच त्यांनी दिली होती. १२ सप्टेंबर २०१७ रोजी आरमोरी नगर परिषदेच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता प्राप्त करून घेतली. त्यानंतर नगर परिषदेची अधिसूचना काढण्यात आली.
न्यायालयीन लढाईत या प्रकरणाच्या ४० तारखा झाल्या. पण जिद्दीने ही लढाई लढल्याने यश पदरी पडल्याची भावना सावकारांनी व्यक्त केली. आरमोरी नगर परिषदेच्या निर्णयाने आरमोरीकर आनंदीत झाले असून या निर्णयाचे शहरवासीयांनी जोरदार स्वागत केले आहे.
दोन ग्रामपंचायतींचा होणार समावेश
आरमोरी नगर परिषदेत आरमोरी, शेगाव, अरसोडा, पालोरा आदी गावांचा समावेश राहणार असून दोन ग्रामपंचायती आरमोरी नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडेल.
पोरेड्डीवारांच्या पाठपुराव्याला यश
आरमोरी नगर परिषद व्हावी, यासाठी नागरिकांच्या मागणीला घेऊन भाजपचे नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांनी राज्य शासनाकडे जोरदार पाठपुरावा केला. न्यायालयीन लढाईत सर्व अडथळे पार करीत मुख्यमंत्र्यांनाही निर्णय घेण्यास प्रवृत्त केले.
शहरात विविध कामे होणार
आरमोरी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून काही दिवसांपूर्वी शहर विकासासाठी पाच कोटी रूपये देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. आरमोरी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो. केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे.
- कृष्णा गजबे,
आमदार, आरमोरी
आरमोरीच्या विकासाला गती मिळणार
आरमोरी शहराचा मॉडेल विकास करण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असते, सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा देण्यासोबतच शहरातील पाणी समस्या, रस्ते, आरोग्य यासाठी आपण पाठपुरावा करण्यास तत्पर आहो, आता आरमोरी नगर परिषद झाल्याने विकास गतीने होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.
- अरविंद पोरेड्डीवार,
सहकार तथा भाजप नेते, आरमोरी