अखेर ‘त्या’ तेंदूपत्ता मजुरांना कंत्राटदाराने दिली थकीत रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:24 PM2017-10-23T23:24:13+5:302017-10-23T23:24:40+5:30
तालुक्यातील वेलगूर व किष्टापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया मजुरांना तेंदूपत्ता कटाईची रक्कम पाच महिने उलटूनही मिळाली नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील वेलगूर व किष्टापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया मजुरांना तेंदूपत्ता कटाईची रक्कम पाच महिने उलटूनही मिळाली नव्हती. याबाबतची तक्रार मजुरांनी १५ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी कंत्राटदाराशी संपर्क साधून रक्कम उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानुसार कंत्राटदारांनी अहेरी येथे येऊन रक्कम उपलब्ध करून दिली. त्यानंतर पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते मजुरांना एकूण ४८ लाख रूपये वितरित करण्यात आले.
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने वेलगूर व किष्टापूरवासीयांना मजुरीची प्रलंबित रक्कम मिळाल्याने या मजुरांची दिवाळी आनंदात साजरी झाली. मागील पाच महिन्यांपासून तेंदू मजुरांची मजुरीची रक्कम थकल्यामुळे मजूर प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते. तेंदू संकलनासाठीचा निधी लवकर प्राप्त होणे गरजेचे आहे. मजुरांची अडचण आपण खपवून घेणार नाही, असे ना. आत्राम यांनी कंत्राटदाराला सांगितले होते. त्यानुसार रक्कम उपलब्ध झाली.
वाढदिवसाच्या दिवशी पालकमंत्री वेलगूर येथे आयोजित आरोग्य मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे उपस्थित दोन्ही गावच्या लोकांनी तेंदूपत्त्याची रक्कम गेल्या ६ महिन्यांपासून मिळाली नसल्याची बाब त्यांचा लक्षात आणून दिली व दिवाळीपूर्वी ही रक्कम लोकांना मिळवून देण्याची मागणी केली.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी तत्काळ तेलंगणा येथील कंत्राटदाराला अहेरीला बोलवून चर्चा केली २ दिवसात रक्कम न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यावर नरम होऊन कंत्राटदाराने तेंदूपत्ता कटाई व बोनसचे ४८ लाख रुपये पोहोचविले.
पालकमंत्री आत्राम यांनी वेलगूर गावात जाऊन तेंदूपत्ता कटाईचे ४८ लाख रुपये गावकºयांना वाटप केले. दिवाळीच्या दिवशीच बहुप्रतिक्षित तेंदूपत्ता कटाईचे पैसे गावकºयांना मिळाल्याने लोकांनी आपली दिवाळी मोठ्या आनंदाने व उत्सवाने साजरी केली. त्यामुळे तेंदुपत्ता मजुरांनी त्यांचे आभार मानले.
फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
अहेरी तालुक्यातील वेलगूर व किष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावातील तेंदूपत्ता मजुरांची मजुरी मागील पाच महिन्यांपासून मिळाली नव्हती. त्यामुळे तेंदूपत्ता मजूर आर्थिक समस्यांना सामोरे जात होते. पालकमंत्र्यांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते. मात्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि आविसंचे नेते अजय कांकडलवार यांनी पुढाकार घेत १६ आॅक्टोबरला संबंधित ठेकेदारांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पुन्हा तेंदू ठेकेदार नागराज यांच्या स्वगावी तेलंगणात जाऊन किमान दोन दिवसाची तरी मजुरी देण्याबाबत चर्चा केली. यावेळी ठेकेदारांनी दोन दिवसांची मजुरी ग्रामसेवकाकडे जमाही केली. असे असताना पाच महिन्यांपासून गप्प असणाºयांनी आता अचानक प्रकट होऊन मजुरी वाटपाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, अशी तंबी आदिवासी विद्यार्थी संघाने दिली आहे.