अखेर दीड पट वेतनाचा शासन आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 03:28 AM2018-09-14T03:28:14+5:302018-09-14T03:28:22+5:30
नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दिलासा
गडचिरोली : राज्याच्या नक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रोत्साहन म्हणून शासनाकडून दिल्या जाणाºया दीडपट वेतन व महागाई भत्त्याचा शासन आदेश अखेर पाच महिन्यानंतर १२ सप्टेंबर रोजी काढण्यात आला. गेल्या १ सप्टेंबरला यासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी लावून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, हे विशेष.
यापूर्वीच्या शासन आदेशानुसार पोलीस कर्मचाºयांना दीड पट वेतन देण्यासंदर्भातील मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंतच होती. त्यामुळे एप्रिल २०१८ पासून वाढीव वेतनाचा कोणताही लाभ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना मिळत नव्हता.
आता गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र, उपपोलीस ठाणे व दुर्गम भागातील पोलीस ठाणे आदींमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना या दीडपट वेतनाचा लाभ मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा, कोरची, कुरखेडा, एटापल्ली आदी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात कार्यरत पोलीस कर्मचाºयांना तसेच विशेष अभियान पथक, क्यूआरटी, सी-६० व एमटी पथकातील कर्मचाºयांनाही दीडपट वेतन लागू राहील.
एप्रिल २०१८ पासून मिळणार वाढीव वेतन
१२ सप्टेंबरला काढलेल्या शासन आदेशानुसार दीडपट वेतनाचा लाभ एप्रिल २०१८ ते मार्च २०२० या दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. अनेक वर्षांपासून या दीडपट वेतनाचा लाभ मिळत असल्याने नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी आपली आर्थिक गुंतवणूक वाढविली होती. पण एप्रिल २०१८ पासून हे वेतन मिळत नसल्याने त्यांची ओढाताण होत होती.