अखेर राकेशचा मृतदेहच आढळला, २० दिवसांपासून होता बेपत्ता
By दिगांबर जवादे | Published: September 8, 2023 05:09 PM2023-09-08T17:09:26+5:302023-09-08T17:12:37+5:30
नातेवाईक २० दिवसांपासून शोध घेत होते, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता
गडचिरोली : मागील २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धानोरा तालुक्यातील तुकुम येथील युवकाचा लेखा नदी तीरावर ८ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. राकेश दामजी कोरेटी (३०, रा तुकूम) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गावाला येताना नदीत वाहून गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राकेश हा अविवाहित असून तुकूम येथे आपली आई व लहान भावासोबत राहत होता. १८ ऑगस्ट रोजी तो आपल्या नातेवाइकाला रक्त देण्याकरिता ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात गेला होता. रात्री गडचिरोली येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला येण्याकरिता निघाला. भावाने फोन केले असता लेखा येथे पोहोचल्याचे त्याने सांगितले, परंतु तो घरी पोहोचला नाही. त्यानंतर त्याच्या मोबाइलवर संपर्क केले असता त्याचा मोबाइल बंद दाखवत होता. नातेवाइकांनी घटनेची माहिती धानोरा पोलिस स्टेशनला दिली.
नातेवाईक २० दिवसांपासून शोध घेत होते. मात्र तो आढळून आला नाही. सकाळी लेखा येथील शेतकरी शेताकडे गेला असता त्याला शेतात मृतदेह आढळून आला. धानोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृताची ओळख पटवली. २० दिवसांपूर्वी जिल्ह्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे लेखा नदी भरून वाहत होती. लेखावरून तो पायदळ गावाकडे जाण्यासाठी निघाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.