‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:36 AM2019-09-05T00:36:53+5:302019-09-05T00:38:30+5:30
दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तालुक्याच्या लष्कर येथील मासु कोमटी तिम्मा या शेतकऱ्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान सदर मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना वनविभागाने आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते. पायावर, चेहऱ्यावर तसेच शरीराच्या अनेक भागावर अस्वलांनी ओरबाळले होते. कसाबसा जीव वाचवून मासू तिम्मा यांनी गावाकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. अहेरी येथे गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. अहेरीवरून गडचिरोलीकडे जात असताना वाटेतच मासू तिम्मा याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी सदर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना ३० हजार रुपये नगदी स्वरूपात वितरित केले. तसेच ४ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी हिंस्त्रपशुंबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.