लोकांच्या आरोग्य समस्या शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:22 AM2018-03-04T01:22:06+5:302018-03-04T01:22:06+5:30
ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या कोणत्या आहेत, असे त्या भागात काम करणाºया डॉक्टरांना विचारले तर बरेचदा काही सामान्य रोगांची नावे घेतली जातात.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या कोणत्या आहेत, असे त्या भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना विचारले तर बरेचदा काही सामान्य रोगांची नावे घेतली जातात. पण या समस्या डॉक्टरांच्या नजरेतील असतात. ग्रामस्थांना, दुर्गम भागातील आदिवासींना त्यांच्या आरोग्याचे प्रश्न काय आहेत हे आपण कधी विचारतो का? याचे उत्तर बरेचदा नाही असेच असते. कारण त्यांचे आरोग्याचे प्रश्नच आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे तुमच्या मनातील नाही तर लोकांना असलेल्या आरोग्याच्या समस्या शोधा, असे प्रतिपादन डॉ. अभय बंग यांनी केले.
दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाद्वारे मोबाईल मेडिकल युनिट (फिरते आरोग्य पथक) सुरु करण्यात आले आहे. या पथकात काम करणाऱ्या राज्यभरातील ३० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना ‘फिरत्या आरोग्य पथकाद्वारे आरोग्य सेवा प्रभावीपणे कशी देता येईल’ या विषयावर २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान सर्च (शोधग्राम) येथे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बंग बोलत होते.
ग्रामीण भागात फिरत्या आरोग्य पथकाद्वारे सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाºयांना अनेक पातळीवर समस्यांना सामना करावा लागतो. अशा वेळी दुर्गम भागातील गावांमध्ये सामाजिक आरोग्याच्या समस्या कशा समजून घ्याव्या, लोक एमएमयू द्वारे कुठल्या आरोग्य सेवा घेतात. एमएमयू द्वारे आरोग्य शिक्षण कसे द्यावे, सेवांचे आणि औषधींचे योग्य नियोजन कसे करावे आदी विषयांवर चर्चात्मक पद्धतीने मार्गदर्शन सदर कार्यशाळेत करण्यात आले. दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या लोकसहभागातून जाणून घेऊन तिथे आरोग्यसेवा कशी देता येईल हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. फिरत्या आरोग्यपथकाचे फायदे व मर्यादा या विषयावरही सांगोपांग चर्चा झाली. सहभागी आरोग्य अधिकाऱ्यांनीही स्वत:चे अनुभव कथन केले. सर्च (शोधग्राम) चे आदिवासी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. योगेश कालकोंडे यांनी सदर कार्यशाळेचे संचालन व मार्गदर्शन केले. सोबतच सर्चचे उपसंचालक तुषार खोरगडे, अमृत बंग, डॉ. कोमल नवले, जितेंद्र शहारे, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र नागपूरचे डॉ. दत्तात्रय त्रिवेदी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे समन्वयक डॉ. समीर आगलावे आणि राजेंद्र कुंभारे यांनीही आरोग्य अधिकाºयांना मार्गदर्शन केले.