ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास बसणार पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 05:00 AM2022-01-03T05:00:00+5:302022-01-03T05:00:29+5:30
वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही वाहन चालविल्यास संबंधितावर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन चालवित असल्यास चालक व मालकावर प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. पूर्वी हा दंड केवळ ५०० रुपये हाेता. वाढत्या वाहनांच्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढली आहे. बहुतांश अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे घडतात.
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : १२ डिसेंबर २०२१ पासून शासनाने वाहतुकीबाबतचे सुधारित दंड जाहीर केले आहेत. यामध्ये वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही वाहन चालविल्यास संबंधितावर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन चालवित असल्यास चालक व मालकावर प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. पूर्वी हा दंड केवळ ५०० रुपये हाेता. वाढत्या वाहनांच्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढली आहे. बहुतांश अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे घडतात. दर दिवशी शेकडाे नागरिकांचा अपघातामध्ये जीव जातो. दंडाची रक्कम अतिशय कमी असल्याने वाहतूक पाेलिसांना वाहनधारक जुमानत नव्हते. वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात हाेते. वाहतुकीचे नियम ताेडणाऱ्यांना जरब बसावा, या उद्देशाने केंद्र शासनाने दंडाचे सुधारित दर जाहीर केले आहेत. काही दंडांमध्ये दहापटपर्यंत वाढ केली आहे. नवीन दंडांमुळे नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील, अशी अपेक्षा आहे.
माेबाईलवर बाेलत वाहन चालविल्यास जावे लागेल थेट न्यायालयात
- पूर्वी माेबाईलवर बाेलताना आढळून आल्यास केवळ २०० रुपयांचा दंड ठाेठावला जात हाेता. आता मात्र संबंधिताता थेट न्यायालयातच पाठविले जाणार आहे. त्याला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतील. न्यायालय जी शिक्षा देईल ती भाेगावी लागणार आहे. माेबाईलवर बाेलताना वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात घडतात. यावर आळा बसण्याची गरज आहे.
प्रति प्रवासी १००० रू.दंड
- एखाद्या चारचाकी वाहनाच्या क्षमतेच्या अधिकचे प्रवासी भरल्यास प्रति प्रवासी एक हजार रुपये दंड ठाेठावला जाणार आहे. पाच प्रवासी अधिकचे असतील तर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाईल.
- काही काळीपिवळी चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. कधीकधी चालकाला बसायला जागा राहत नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.