२८ प्रकरणात ६० लाख ४२ हजाराचा दंड वसुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:34+5:302021-03-14T04:32:34+5:30
चामोशी- तालुक्यातील विविध नदीघाटातून ,मुरुम खाणीतून गेल्या वर्षभरात रेतीची, मुरुम, दगडाचे ट्रॅक्टर , हायवाद्वारा अवैधपणे चोरी करून वाहतूक ...
चामोशी- तालुक्यातील विविध नदीघाटातून ,मुरुम खाणीतून गेल्या वर्षभरात रेतीची, मुरुम, दगडाचे ट्रॅक्टर , हायवाद्वारा अवैधपणे चोरी करून वाहतूक करणाऱ्या २८ प्रकरणात तालुका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. यात रेती तस्करांकडून ६० लाख ४२ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे.
मागील वर्षीपासून रेतीघाटाचे लिलाव बंद असल्याने रेती चोरीला चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. म्हणून रात्रीच्या वेळेस रेतीची चोरी करणे सुरू केले. जवळील अनेक नदी घाटात रात्रीच्या वेळी रेती चोरांचा धुमाकूळ सुरू असतो. रात्री नदी घाटातून १२ वाजतापासून तर पहाटेपर्यन्त रेतीची अवैध वाहतुक (विनापरवाना )चोरी सुरू असते . काेणत्याही अधिकाऱ्यांची गाडी येऊ नये म्हणून रात्री रेती तस्करांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते अशीही माहिती आहे. तरीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती तस्कराच्या मुसक्या आवळणे सुरू केले. चामोर्शीच्या महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या जवळपास रेतीच्या २३ प्रकरणात ५१ लाख ५० हजार ६०० रुपये , मुरूमाच्या ४ प्रकरणात ६ लाख ८६ हजार रुपये , दगडाच्या एका प्रकरणात १ लाख ५ हजार ४०० रूपये आहे. सर्व मिळुन एकूण ६० लाख ४२ हजार रुपये २८ प्रकरणात दंड ठोकून ट्रॅक्टरवर व इतर वाहनावर कारवाई केली आहे. लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या वर्षभराच्या काळात विनापरवाना वाहतूक करणाऱ्या अवैध रेती, मुरुम, दगड चोरणाऱ्या २८ प्रकरणात ट्रॅक्टर व इतर वाहनावर दंड व रायल्टीची रक्कम रेती तस्करकडून ६० लाख ४२ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. रेतीची चोरी करताना ट्रॅक्टर सापडल्यास १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. महसूल विभागाच्या कारवाया सुरू असल्यातरी रात्रीच्या वेळेस रेतीची चोरी सुरूच आहे. चामोर्शी तालुक्याच्या सिमेवरून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील गणपूर, दोटकुली, बोरघाट , जयरामपूर, वाघोली , मोहुली , तळोधी मोकासा, कुरुळ आदी गावातील रेती घाटाचा लिलाव झाला नाही . त्यामुळे विविध बांधकामासाठी रेती चोरून विक्री करण्याचा धंदा सुरू केला आहे . त्यामुळ रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .