गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 07:33 PM2018-02-05T19:33:49+5:302018-02-05T19:38:08+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लााखांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लााखांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.
विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटने ही आग लागली. ५० खाटांच्या या रुग्णालयात सुमारे ७० रुग्ण भरती होते. टेलिमेडिसीन रुममधील विद्युत तारांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच विद्युत पुरवठा खंडित केला. रुग्णालयातील अग्निशमन यंत्र आणि टाकीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
रुग्ण भरती असलेल्या दोन्ही वॉर्डात ही आग पसरली नाही. मात्र आतील भागात सर्वत्र धूर पसरल्याने भरती रुग्णांची तारांबळ उडाली. आगीत विद्युत पुरवठ्याची वायरिंग जळाल्यामुळे रूग्णालयाचा विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रिया ठप्प राहण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी अहेरी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली. सात महिन्यांपूर्वीच नगर पंचायतला ८५ लाख रुपये खर्चून अग्निशमन वाहन देण्यात आले. मात्र प्रशिक्षित कर्मचारीच नसल्यामुळे हे वाहन शोभेचे ठरले. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयाची वायरिंग खूप जुनी आहे. मशिनरी आधुनिक लागल्या. त्यासाठी वायरिंग बदलणे गरजेचे आहे. वायरिंग दुरूस्तीसाठी यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निधी मागितला. मात्र मिळाला नसल्यामुळे दुरूस्ती होऊ शकली नाही.
- डॉ.कन्ना मडावी, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी