आलापल्लीत गोदामाला आग

By admin | Published: May 6, 2017 01:15 AM2017-05-06T01:15:36+5:302017-05-06T01:15:36+5:30

आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली.

Fire at the Alpaili godown | आलापल्लीत गोदामाला आग

आलापल्लीत गोदामाला आग

Next

५० लाखांचे नुकसान : कपडे, बांगड्या, चपला जळून खाक; पंचनामा करून मदतीची मागणी
प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/आलापल्ली : आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास १० दुकानदारांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. यामध्ये जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आलापल्ली येथील आठवडी बाजार परिसरात पांडे लाईनमन यांच्या मालकीची चाळ आहे. सदर चाळ आलापल्ली येथील काही दुकानदारांनी दुकानातील सामान ठेवण्याासठी भाडे तत्वावर घेतली होती. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत तर्फे गोदामाच्या अगदी मागच्या बाजुला असलेल्या कचऱ्याच्या ढिगांना आग लावली होती. सदर आग गोदामापर्यंत पोहोचली व गोदामाला आग लागली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या गोदामामध्ये विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शार्टसर्कीटने आग लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
आग लागल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस उपनिरिक्षक कोळेकर, वाहतूक पोलीस हवालदार संतोष मंथनवार, पोलीस हवालदार संतोष पवार यांनी बाजारवाडीतील युवकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत गोदामातील सामान जळून खाक झाले. आग लागल्यावर ग्रामपंचायतमधील एकही पदाधिकाऱ्याने घटनास्थळी हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या ठिकाणी सामान ठेवणारे दुकानदार विविध बाजार फिरून दुकान थाटत होती. या दुकानदारांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आलापल्लीचे तलाठी एकनाथ चांदेकर यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. आलापल्ली उपविभागात अग्नीशमन दलाचे वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ज्या नागरिकांचे सामान जळाले आहे, ते नागरिक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

या दुकानदारांचे झाले नुकसान
स्वप्नील शिंदे यांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सिकदर यांचे ४.५ लाख, जीवन सिकदर यांचे ३ लाख, नारू आईलवार यांचे ३ लाख, जयश्री कुमरे यांचे ३ लाख, पद्मावती मडावी यांचे १.५ लाख, अन्नपूर्णा समुद्रकोलावार यांचे दोन लाख, अशोक बंडावार व संतोष बंडावार यांचे चार लाख, पद्मा नाईलवार यांचे चार लाख, लक्ष्मीबाई मित्रावार यांचे चार लाख, पुष्पा सिकदर यांचे चार लाख, अशोक दुर्गे यांचे दोन लाख, उमा गुडलवार यांचे तीन लाख, श्रीनिवास रामगिरवार यांचे १.५ लाख, भास्कर राऊत यांचे एक लाख, किशन रामटेके यांचे १.५ लाख, छत्रपती खोब्रागडे यांचे एक लाख, फिरोज शेख १.५ लाख, मदनाबाई रामगिरी एक लाख, हयद खान यांचे दोन लाख, श्रीनिवास मनिषा यांचे ५० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कपडे, दागिणे, भांडे, चपल, बांगड्या आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

 

Web Title: Fire at the Alpaili godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.