निम्म्याहून अधिक एसटी बसेसमधील अग्निशमन यंत्रे झाली गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 05:00 AM2021-03-05T05:00:00+5:302021-03-05T05:00:17+5:30
गडचिराेली आगारात एकूण १०३ बस आहेत. यातील बहुतांश बसचे वयाेमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत गडचिराेली आगाराला बस उपलब्ध करून देतेवेळी नेहमीच दुजाभाव केला जातो. दुसऱ्या आगारात काही वर्षे वापरलेल्या बस उपलब्ध करून दिल्या जातात. सर्वसाधारण चांगल्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर तर भंगार बस ग्रामीण भागात पाठविल्या जातात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महाराष्ट्राची लाेकवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटीची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. याचा थेट परिणाम एसटी बस गाड्यांवर दिसून येत आहे. एसटी हे प्रवाशी वाहन आहे. बसमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्र असणे आवश्यक आहे. मात्र, गडचिराेली आगारातील जवळपास निम्म्या बसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याची गंभीर बाब ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
गडचिराेली आगारात एकूण १०३ बस आहेत. यातील बहुतांश बसचे वयाेमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत गडचिराेली आगाराला बस उपलब्ध करून देतेवेळी नेहमीच दुजाभाव केला जातो. दुसऱ्या आगारात काही वर्षे वापरलेल्या बस उपलब्ध करून दिल्या जातात. सर्वसाधारण चांगल्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर तर भंगार बस ग्रामीण भागात पाठविल्या जातात. एसटीचे चाक दिवसेंदिवस ताेट्यात रुतत चालल्याने कसेतरी करून प्रवाशांना सेवा देण्याचा संघर्ष एसटी करीत आहे. यासाठी कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपतकालीन दरवाजे वेल्डिंगने लाॅक
अपघात किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास प्रवाशांना बसमधून उतरता यावे, यासाठी एक स्वतंत्र आपातकालीन दरवाजा दिला राहते. या दरवाजाला वर बाजुला दाेन कड्या राहतात. लाेकमतने केलेल्या पाहणीत एका मानव विकास मिशनच्या बसचा दरवाजा वेल्डिंगने लाॅक करण्यात आला हाेता. ही स्थिती इतरही बसमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चालकाच्या कॅबिनची दुरवस्था
चालक हा बसचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चालकाला बसमध्ये बसल्यावर साेयीचे वाटणे आवश्यक आहे. मात्र, बसच्या कॅबिनची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक स्विच तुटले आहेत. एकमेकांना वायर जाेडून काम चालविले जात आहे. बहुतांश बसच्या हाॅर्नचे बटन तुटलेले आहेत. वायर स्पार्किंग करून हाॅर्न वाजविली जात असल्याची माहिती चालकांनी दिली.
बसस्थानकावर दुचाकी वाहने
गडचिराेलीच्या बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भागात वाहने ठेवता येतात. मात्र, प्रवाशी थेट बसस्थानकापर्यंत वाहने नेतात. यासाठी काेणीही अटकाव करीत नाही. बसस्थानकाच्या समाेरच्या भागात प्रवाशी व बसची वर्दळ राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
बहुतांश बसचे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत आहेत. एखाद्या बसचा दरवाजा वेल्डिंग करून लाॅक असेल तर ताे तत्काळ दुरुस्त केला जाईल. जवळपास ६० टक्के बसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध आहे. काही यंत्रांची मागणी करण्यात आली आहे.
- मंगेश पांडे,
आगारप्रमुख, गडचिराेली