राजन्नापल्ली येथे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:56 PM2018-09-12T23:56:19+5:302018-09-12T23:56:57+5:30
गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील आरडा ग्रामपंचायतीअंतर्गत राजन्नापल्ली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत घरमालक चिलमुला यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेवटर्क
सिरोंचा : गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील आरडा ग्रामपंचायतीअंतर्गत राजन्नापल्ली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत घरमालक चिलमुला यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
सिरोंचापासून १० किमी अंतरावरावरील राजन्नापल्ली येथील शंकर चिलमुला यांच्या घरी सोमवारी सकाळी स्वयंपाक केल्यानंतर गॅस बंद करण्यात आला नाही. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वयंपाकासाठी पुन्हा गॅस सुरू केला असता, गॅस लिकेज होऊन आग लागली. काहीवेळातच आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. घरातील सर्व कुटुंबीयांनी कसेबसे बाहेर पडून आरडाओरड केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी आग विझविण्यासाठी सदर घराकडे धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यात यश आले नाही. परिणामी चिलमुला यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. पाणी टँकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझविण्यात आली. मात्र घरातील दागिणे, कपडे, भांडे व इतर साहित्य जळून खाक झाले. आरडाचे सरपंच बापू रंगुवार यांनी चिलमुला कुटुंबाला किराणा साहित्य दिले तसेच आर्थिक मदतही केली.
शॉर्ट सर्किटने ग्रामीण रुग्णालयास आग
स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील औषधसाठा खोलीत शॉर्ट सर्किटने अचानक आग लागल्याने रुग्णालय इमारतीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किने आग लागून धूर निघत असल्याचे लक्षात येताच रुग्णालयात कार्यरत परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत दाखल रुग्णांना सुरक्षितरित्या दवाखान्याच्या बाहेर काढले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.धकाते यांना भ्रमणध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश जाधव व पोलीस कर्मचाºयांनी रुग्णालयातील आग विझविण्यासाठी मदत केली. डॉ.धकाते यांनी नगर पंचायतीला संपर्क करून अग्निशामक वाहन पाठविण्यास सांगितले. मात्र येथील अग्निशमन वाहन नादुरूस्त असल्याने त्याची सेवा वेळेवर मिळू शकली नाही. या प्रकाराने येथील अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयी अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.