फायर लाईन यंत्रणा निष्प्रभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:35 PM2018-03-08T22:35:17+5:302018-03-08T22:35:17+5:30

आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी फायरलाईन जाळली जाते. यावर कोट्यवधी रूपये खर्च होत असले तरी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण थांबले नाही. यावरून फायरलाईन जाळण्याबरोबरच इतर उपाययोजनाही निष्प्रभ ठरत आहे.

Fire line system is inaccessible | फायर लाईन यंत्रणा निष्प्रभ

फायर लाईन यंत्रणा निष्प्रभ

Next
ठळक मुद्देवनविभागाचा कोट्यवधींचा खर्च : इतरही उपाययोजनांकडे लक्ष देण्याची आवश्यकता

प्रदीप बोडणे।
आॅनलाईन लोकमत
वैरागड : आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी फायरलाईन जाळली जाते. यावर कोट्यवधी रूपये खर्च होत असले तरी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण थांबले नाही. यावरून फायरलाईन जाळण्याबरोबरच इतर उपाययोजनाही निष्प्रभ ठरत आहे.
विदर्भातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक वनक्षेत्र पूर्व विदर्भात आहे. पानझडी वृक्ष असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून पाने झडण्यास सुरुवात होते. परिणामी जंगलात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा जमा होतो. उन्हाळ्याच्या उन्हामुळे सदर पालापाचोळा पूर्णपणे सुखते. याच कालावधीत मोहफूल पडण्यास सुरुवात होते. मोहफूल वेचण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी काही नागरिक मोहाच्या झाडाखालचा पालापाचोळा जाळण्याच्या उद्देशाने आग लावतात. सुखलेला पाला व गवतामुळे सदर आग पसरून रौद्ररूप धारण करते. त्याचबरोबर काही शेतकरी रब्बीचा हंगाम आटोपल्यानंतर शेताची साफसफाई करण्याच्या उद्देशाने शेतात आग लावतात. ही आग सुद्धा काही वेळानंतर जंगलापर्यंत पोहोचून रौद्ररूप धारण करते. काही वेळा तेंदूपत्ता ठेकेदार तेंदूच्या झाडांना जास्त फुटवे यावे, या उद्देशानेही जंगलांना आगी लावतात.
जंगलांना आगी लागण्याचे ही प्रमुख कारणे असले तरी वन विभाग या कारणांकडे फारसे लक्ष देत नाही. दरवर्षीप्रमाणे केवळ रस्त्याच्या बाजूचे गवत कापण्याकडे किंवा गवताला आग लावून ते जाळण्याकडे लक्ष देते. याला वन विभाग फायरलाईन जाळणे हा शब्दप्रयोग करते. रस्त्याने जाणाºया वाटसरूने बिडी किंवा सिगारेट पिऊन ती रस्त्याच्या बाजूने टाकल्याने जंगलांना आगी लागतात, असा समज वन विभागाचा झाला आहे. हे जरी काही प्रमाणात सत्य असले तरी सर्वच आगी केवळ वाटसरूमुळे लागत नाही. हे आजपर्यंतच्या अनेक आगीच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. मात्र वन विभाग इतर उपाययोजना न करता केवळ दरवर्षी फायरलाईन जाळण्याचेच काम करीत असल्याचे दिसून येते. फायरलाईन जाळण्यावर दरवर्षी राज्यभरात वन विभागाचे कोट्यवधी रूपये खर्च होतात. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम अजूनपर्यंत तरी दिसून आलेले नाहीत. यावरून जखम पायाला व पट्टी डोक्याला असा प्रकार वन विभाग करीत असल्याचे दिसून येत आहे.

जनजागृतीची गरज
शेतात किंवा मोहफूल वेचण्यासाठी सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने लावलेल्या आगीमुळे जंगलांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी यांच्यामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र वन विभाग अशा प्रकारची जनजागृती फारशी करीत नसल्याचे दिसून येते.
जंगलाला आग लागल्यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लहान रोपटे जळून खाक होतात. पक्ष्यांची घरटे उद्ध्वस्त होतात. आगी लागण्याचे परिणाम नागरिकांना पटवून देणे आवश्यक आहे.

जंगलांना आगी लागू नये म्हणून आतापासूनच उपाययोजना चालू आहे. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जातीने लक्ष देऊन आहेत. वनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायरलाईन जाळण्याचे काम सुरू आहे.
- एच.डी. बारसागडे, वनपरिक्षेत्राधिकारी, आरमोरी

Web Title: Fire line system is inaccessible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.