वीज नाही तरीही अंगणवाडीत अडकविले पंखे
By admin | Published: October 14, 2015 01:55 AM2015-10-14T01:55:28+5:302015-10-14T01:55:28+5:30
आदिवासी विकास विभागाने विद्युत पुरवठा नसलेल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये खरेदी करून इलेक्ट्रिक पंखे फिट केले आहेत.
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाने विद्युत पुरवठा नसलेल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये खरेदी करून इलेक्ट्रिक पंखे फिट केले आहेत. हे पंखे सध्या शोभेची वस्तू ठरले असून यावर झालेला शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विकास प्रक्रियेचा निधी खर्च केला जातो. याअंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, जनरेटर या वस्तूंचा पुरवठा करून लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. त्यानंतर या वस्तू किलोच्या भावाने अनेक ठिकाणी भंगारमध्ये विकल्या गेल्या. अशी परिस्थिती असताना मागील अडीच-तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १५०० अंगणवाड्यांमध्ये इलेक्ट्रिक पंख्याची फिटिंग करण्यात आली. अनेक अंगणवाड्यांमध्ये विजेचा पुरवठा नसतानाही हे काम करण्यात आले. आता या पंख्यांचे पाते गंजण्याच्या अवस्थेत आले आहेत. हे पंखे निरूपयोगी झाले आहेत. अंगणवाडीत वीज नाही, ही माहिती असतानाही पंखा पुरवठ्याचा अट्टाहास का करण्यात आला, हा एक संशोधनाचाच भाग आहे. गेल्या दोन-तीन वर्षात आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना मोठ्या प्रमाणावर साहित्य पुरविण्याचे काम करण्यात आले. यातून लाखो रूपये निधी खर्च झाला.