आधुनिक प्रयोगशाळेचे पहिलेच रु ग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:30 PM2018-04-16T23:30:57+5:302018-04-16T23:30:57+5:30
येथील इंदिरा गांधी चौकात उभारण्यात आलेले १०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील एक मैलाचा दगड ठरणार आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात उभारण्यात आलेले १०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील एक मैलाचा दगड ठरणार आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. सेंट्रल क्लिनिकल लेबॉरेटरीने सुसज्ज असे हे रुग्णालय राज्यातील पहिलेच महिला व बाल रुग्णालय असल्याचे सांगितले जात आहे.
लोकार्पणानंतर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी विविध सुविधांची पाहणी केली. येथे स्त्रियांच्या गर्भाशय कर्करोगाचे निदान करता येईल असे काल्पोस्कोपी हे यंत्र बसविण्यात आले आहे. यासोबत सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लांट, सोलर वॉटर हिटर आणि रेन वॉटर हार्वेटिंग यंत्रणा असल्याने हे एक प्रकारे पर्यावरण अनुकूल असे ग्रीन हॉस्पिटल ठरले आहे.
विदर्भ विकास कार्यक्र म २००९ अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकाराने हे रुग्णालय मंजूर झाले होते. त्याचे भूमीपूजन ५ डिसेंबर २०१० रोजी त्यांच्याच हस्ते झाले होते. इमारतीचे एकूण बांधकाम ८४७१.९८ चौरस मीटर असून यासाठी १८ कोटी ७७ लक्ष ९ हजार रु पये खर्च आला आहे.
या रु ग्णालयासाठी ६६ पदे मंजूर झालेली आहेत. यात एक अधीक्षकाचे पद असून एक स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ आहे. २ बधिरीकरण तज्ज्ञ, २ बालरोग तज्ज्ञ व एक क्ष-किरण तज्ज्ञ आहे. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या ८ आहे. ६६ पैकी ५७ पदे कार्यरत आहेत. वर्ग ३ ची ५ आणि वर्ग ४ ची २४ पदे बाहय यंत्रणेमामार्फत भरण्यात येत आहेत.
फायर फायटिंग सिस्टमसाठी ५० लाखांची मागणी
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे डिझाईन बनविले त्यावेळी त्यात फायर फायटिंग सिस्टमची तरतूद नव्हती. पण अलिकडे झालेल्या काही आगीच्या घटनानंतर अशा मोठ्या इमारतींसाठी तशी आगरोधक यंत्रणा असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त ५० लाख रुपयांची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली आहे. तो निधी मिळताच इमारतीमध्ये तशी सुधारणा करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तुर्त इमारतीत ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र लावण्यात आले आहेत.