प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलची मयुरी रामटेके जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:07 AM2019-06-09T00:07:40+5:302019-06-09T00:08:13+5:30
दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी घोषीत करण्यात आला. गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी रामटेके हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी घोषीत करण्यात आला. गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी रामटेके हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या निकालात मात्र बरीच घसरण झाली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ८५.८९ टक्के लागला होता. यावर्षीचा निकाल केवळ ५४.६५ टक्के एवढा लागला आहे.
जिल्हाभरातून १४ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ७५१ मुलांपैकी ३ हजार ९१६ मुले उत्तीर्ण झाली. त्याची टक्केवारी ५०.५२ टक्के एवढी आहे. ७ हजार २१८ मुलींपैकी ४ हजार २६४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ५९.६० टक्के एवढी आहे. ७५८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३ हजार ३५६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार ६५१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४१५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी निकालाची टक्केवारी कमी आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही मागील वर्षीच्या तुलनेत कमी गुण मिळाले आहेत. प्लॅटिनम ज्युबिलीची विद्यार्थिनी मयुरी रामटेके ही प्रथम आली आहे. प्लॅटिनम ज्युबिलीचीच अनुष्का बकडे व चामोर्शी येथील कारमेल अॅकडमीचा विद्यार्थी हर्ष बोनगिरवार या दोघांना ९४.२० टक्के गुण मिळाले आहेत. हे दोघेही संयुक्तपणे द्वितीय क्रमांकावर आहेत. प्लॅटिनम ज्युबिलीची साक्षी आष्टेकर हिला ९३.८० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यावर्षीच्या निकालात सर्वाधिक परिणाम दुर्गम भागातील शाळांवर झाला असल्याचे दिसून येत आहे. भामरागड तालुक्याचा निकाल केवळ २६.१६ टक्के आहे. एटापल्ली तालुक्याचा निकाल २६.२६ टक्के आहे. मुलचेरा तालुक्याचा निकाल ३८.५२ टक्के एवढा आहे. यापुढे निकाल चांगला लावणे शिक्षकांसमोर आव्हान ठरणार आहे.
मयुरी व साक्षीला बनायचे आहे डॉक्टर
जिल्ह्यातून प्रथम आलेली मयुरी शैलेश रामटेके हिला हार्ट सर्जन बनायचे आहे. तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या साक्षी दिलीप आष्टेकर या विद्यार्थिनीला स्त्रीरोगतज्ज्ञ बनायचे आहे. डॉक्टर बनल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातच आरोग्य सेवा करायची आहे, असा मनोदय दोघींनीही लोकमतसमोर व्यक्त केला. दोघीही प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. दोघींमध्ये अभ्यासाची स्पर्धा व जिद्द होती, अशी माहिती प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रहिम अमलानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. विद्यार्थिनी व पालकांचा संस्थेचे जनरल सेक्रेटरी अजीज नाथानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मागील वर्षीच्या तुलनेत ३१.२४ टक्क्यांनी निकाल घटला
मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल सुमारे ८५.८९ टक्के एवढा लागला होता. यावर्षी मात्र ५४.६५ टक्के एवढाच निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ३१.२४ टक्क्यांनी घसरला आहे. ९० पेक्षा अधिक टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. मागील वर्षी १०० टक्के निकाल देणाºया सुमारे ४४ शाळा होत्या. यावर्षी केवळ नऊ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. सहा शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. तर ३९ शाळांचा निकाल २० टक्केपेक्षा कमी लागला आहे.
जुन्या अभ्यासक्रमात प्रत्येक विषयाला २० टक्के अंतर्गत गुण ठेवण्यात आले होते. हे गुण देण्याचे अधिकार शाळेकडे होते. केवळ ८० गुणांचा लेखी पेपर राहत होता. प्रत्येक विषयात अंतर्गत गुण मिळत असल्याने उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. तसेच गुणही अधिक मिळत होते. हा प्रकार शिक्षण मंडळाच्या लक्षात आल्यानंतर शिक्षण मंडळाने नवीन अभ्यासक्रमात हिंदी, मराठी, इंग्रजी या तीन भाषांसाठी असलेले अंतर्गत गुण काढून टाकले. केवळ गणित व विज्ञान या दोनच विषयांना अंतर्गत गुण देण्याची सुविधा ठेवली. त्यामुळे यावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत गडगडला आहे.