पहिल्याच पावसाळ्यात बंधारा गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:33 AM2019-09-01T00:33:41+5:302019-09-01T00:36:03+5:30
बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे चार महिन्यांपूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. सदर बंधारा पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरची तालुक्यात पड्यालजोग येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसात पाच, हुडूकदुम्मात दोन, खसोडाला, काडे येथे प्रत्येकी दोन असे एकूण १६ बंधारे मंजूर केले. १६ बंधारे कंत्राटदाराने स्वत: लेआऊट टाकून बांधले. त्यापैकी बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे १० टीसीएम क्षमतेचा बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. बंधारे बांधकाम सुरू असताना अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र बांधकामादरम्यान अभियंत्यांनी भेटच दिली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या परीने बंधारा बांधून पैसे उचलले. पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला आहे. बंधाऱ्याचे दोन तुकडे पडले आहेत. यावरून बंधारे काम निकृष्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले होते. मात्र या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंत्राटदार व जलयुक्त शिवार अभियानाच्या अभियंत्यांचाच फायदा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करा
बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली. संपूर्ण बंधाऱ्याचे बांधकाम झाले तरी एकही अभियंता कामावर फिरकला नाही, अशी माहिती गावकऱ्यांनी लोकमतला दिली आहे. या बंधाऱ्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून बंधाऱ्याची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आहे. याबाबत उपविभागीय अभियंता बरडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. कोरची तालुक्यातील इतर १६ ठिकाणच्या बंधाºयाचेही बांधकाम निकृष्ट झाले असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.