निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ !

By गेापाल लाजुरकर | Published: April 27, 2023 07:28 PM2023-04-27T19:28:47+5:302023-04-27T19:29:04+5:30

शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा : नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज

First step to the school gadchiroli in one and a half thousand schools today | निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ !

निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ !

googlenewsNext

गडचिराेली : इयत्ता पहिलीत दाखलपात्र बालकांमधील शाळेविषयी असलेली भीती दूर व्हावी, त्यांच्या प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गाेडी वाढावी व शाळांकडून नवागतांची प्राथमिक शिक्षणासाठी तयारी करून घेता यावी यासाठी ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ राज्यभर राबविले याच आठवड्यात जाणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात हे अभियान २८ एप्रिल राेजी सर्वच प्राथमिक शाळांमध्ये राबविले जाणार असून नवागतांची प्राथमिक शाळा प्रवेश तयारी करण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या निरागस किलबिलाटासह जिल्ह्यातील दीड हजार शाळांमध्ये नवागतांचे ‘पहिले पाऊल’ पडेल. गडचिराेली जिल्हा परिषद अंतर्गत १ हजार ४९२ प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय दाेन नगर परिषदेतील १८ अशा संपूर्ण १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५१० प्राथमिक शाळा जिल्ह्यात आहेत.

काही आश्रमशाळांमध्येसुद्धा इयत्ता पहिलीपासून वर्ग आहेत. परंतु जि.प. व न.प. शाळांमध्येच शाळापूर्व तयारी मेळावा घेतला जाणार आहे. नवीन सत्र सूर हाेण्यापूर्वी प्रवेश मेळावा घेतला जाईल. २८ एप्रिल राेजीचा पहिला मेळावा जि.प. शिक्षण विभाग (प्राथमिक) तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिराेली यांच्या माध्यमातून शाळा पूर्वतयारी मेळावा यशस्वी केला जाणार आहे. याकरिता शिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे व डायटचे प्राचार्य डाॅ. विनित मत्ते यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञांनी नियाेजन केले.

सात स्टाॅलवर हाेणार विद्यार्थ्यांची पारख
शाळा पूर्व तयारी मेळाव्यात दाखलपात्र मुले आल्यानंतर येथे त्या मुलांची सात स्टाॅलवरून पारख हाेईल. म्हणजेच त्यांच्यातील क्षमता तपासल्या जातील. यात पहिले स्टाॅल नाव नाेंदणी व वजन-उंची माेजणीचे आहे. दुसरे स्टाॅल शारीरिक विकास, तिसरे बाैद्धिक विकास, चाैथे स्टाॅल सामाजिक व भावनात्मक विकास, पाचवे स्टाॅल भाषा विकास तर सहावे स्टाॅल गणनपूर्वतयारीचे आहे. सहा टप्प्यातून मूल आल्यानंतर त्याच्यात काेणत्या क्षमता हव्या व बदल आवश्यक आहे यासाठी सातव्या स्टाॅलवर पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन हाेईल.

विकासपत्र व पुस्तिका मिळणार
दाखलपात्र मुलांची सात स्टाॅलवरून पारख म्हणजेच त्याच्यातील क्षमता तपासणी झाल्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांना विकासपत्र व ‘पहिले पाऊल’ पुस्तिका दिली जाईल. सदर विकास पत्रात विद्यार्थ्यांच्या क्षमता काय व त्याच्यात पुन्हा अपेक्षित बदल काय हवेत याबाबत नाेंद केली जाईल.तर ‘पहिले पाऊल’ पुस्तिकेत पुढील आठ आठवड्यात मुलांमध्ये काय अपेक्षित बदल हवा यााबत मार्गदर्शनात्मक माहिती राहिल. याबाबत गावातीलच लिडर माता संबंधित पालकांना सांगतील.

दाखलपात्र मुले शाळेत भरती हाेण्यापूर्वी त्यांची पूर्व तयारी व्हावी, यासाठी पहिले पाऊल मेळावा घेतला जात आहे. यामाध्यमातून मुलांमधील विविध क्षमता तपासून त्यानुसार त्यांना नवीन शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीसाठी तयार केले जाईल. विशेष म्हणजे, शाळा प्रवेशाच्या दृष्टीने मुलांचा उत्साह वाढविण्यासाेबतच त्याच्यातील विविध क्षमता तपासल्या जातील.
प्रा. वैशाली येगलाेपवार,
जिल्हा नाेडल अधिकारी शाळा पूर्व तयारी अभियान

Web Title: First step to the school gadchiroli in one and a half thousand schools today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.