कमलापुरात पोहोचली पहिल्यांदाच बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:31 AM2017-09-22T00:31:20+5:302017-09-22T00:31:30+5:30
अतिसंवेदनशील दुर्गम व आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या कमलापूर गावात पहिल्यांदाच २० सप्टेंबर रोजी बस पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अतिसंवेदनशील दुर्गम व आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या कमलापूर गावात पहिल्यांदाच २० सप्टेंबर रोजी बस पोहोचली. बस दिसताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी बसचालक व वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अहेरी-सिरोंचा बस गोलाकर्जी मार्गे राजाराम, छल्लेवाडा कमलापूरवरून सिरोंचा-कालेश्वरला जाणार आहे. तर सायंकाळी सदर बस याच मार्गे परत अहेरी येथे जाणार आहे. या बसच्या एकूण ४ फेºया राहणार आहेत. कमलापूर मार्गे बससेवा नसल्याने नागरिकांची फार मोठी अडचण निर्माण होत होती. नागरिकांना पायदळ किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. गावात बस आल्याचे माहित होताच वाहक व्ही.डी. जाधव, चालक एस.एस. दुयले यांचा कमलापुरातील नागरिकांनी सत्कार केला.
यावेळी लक्ष्मीनारायण रापेली, राजेश कासुलवार, महेश गोदवार, संदीप येमुलवार, हरीष पब्बावार, आतिश शेख, रमेश कडार्लावार, मेहरा अडीचेरलावार, तिरूपती किर्तीवार, नारायण येर्रारक्का, रेखा कासुलवार उपस्थित होते.