स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विसामुंडीत पोहोचली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:00 AM2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:26+5:30
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २०० किलोमीटर अंतरावर आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विसामुंडी या आदीवासी गावात मंगळवारी (दि.२६) तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदारांचे गाव शिवारातून आदीवासी नागरिकांनी परंपरागत ढोल-सनईच्या सुरात स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : प्रत्येक गाव इंटरनेट, मोबाईलने जोडण्याचे स्वप्न दाखविले जात असले तरी स्वातंत्र्याच्या ७० वर्षात जीवनावश्यक बाब झालेली वीज अद्याप काही गावात पोहोचलेली नाही. त्यापैकीच एक गाव असलेल्या भामरागड तालुक्यातील विसामुंडी या गावात नवीन ट्रान्सफार्मर देऊन गावात पहिल्यांदाच वीज पुरवठा करण्यात आला. यामुळे वर्षानुवर्षे रात्रीला दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात वावरणारे गाव वीजेच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाल्याचे पाहून गावकरी आनंदात न्हाऊन निघाले.
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २०० किलोमीटर अंतरावर आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विसामुंडी या आदीवासी गावात मंगळवारी (दि.२६) तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदारांचे गाव शिवारातून आदीवासी नागरिकांनी परंपरागत ढोल-सनईच्या सुरात स्वागत केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मेश्राम, तलाठी राममुर्ती गड्डमवार, कोतवाल दौलत तलांडे यांच्यासह सर्व गावकरी उपस्थित होते .
गावात आतापर्यंत वीज नसल्याने नागरिकांना टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट यापासून वंचित राहावे लागत होते. रात्रीच्या सुमारास शेकोटी पेटवुन दिवस काढावे लागत होते. दुर्गम भाग असल्याने वन्यप्राण्यांचाही धोका असायचा. त्यामुळे रात्रीच्या अंधारात कसाबसा जीव मुठीत धरून राहावे लागत असे. जिल्हा नियोजन व विकास योजनेतुन या गावाचे विद्युतीकरण तसेच सौभाग्य योजनेतून नागरिकांना वीज जोडणी देण्याच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षापुर्वीच काम हाती घेतले होते. परंतु खांब उभारणी, विजेचे तार जोडणीचे काम अर्धवट टाकून सदर ठेकेदार बेपत्ता झाला होता. त्यामुळे काम रखडले होते.
याबाबतीत गावातील सूज्ञ नागरिक, परिसरातील काही पुढाऱ्यांनी अनेक वेळा निवेदनेही दिली. मात्र अधिकारी, पदाधिकारी याकडे फारसे लक्ष देत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी तहसीलदार कैलास अंडील यांची भेट घेऊन गावात वीज पुरवठा देण्याची मागणी केली. त्यांनी सदर काम कुठे थांबले आहे याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केला. जिल्हाधिकाºयांनीही तत्परतेने प्रतिसाद देऊन हे काम मार्गी लावले. अखेर गेल्या पाच-सहा वर्षापासून रखडलेले हे काम पुन्हा सुरू होऊन अखेर वीज जोडणी पूर्ण करण्यात आली.
दिवसा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर रात्री वीजेच्या दिव्यांमुळे पडणारा लख्ख प्रकाश पहिल्यांदाच गावकऱ्यांनी अनुभवला. त्यामुळे ते चांगलेच हरखून गेले होते. सध्या प्रत्येक घरी वीज जोडणी नसली तरी लवकरच प्रत्येक घरात वीज पुरवठा दिला जाणार आहे.
परिसरातील गावकऱ्यांच्या आशा पल्लवित
तहसीलदार अंडील यांच्या हस्ते मंगळवारी वीज पुरवठ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरात कत्रणगट्टा, मर्दहूर व गुंडपुरी गावातील लोकही जमले होते. त्या गावांमध्येही अजून वीज पोहोचलेली नाही. त्यांनी आपल्या गावातही वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. लवकरच त्या गावांतही वीज पुरवठ्याचे काम सुरू करण्याची ग्वाही त्यांनी गावकऱ्यांना दिली.
विसामुंडी गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत. जंगलातून बैलबंडीने कच्च्या मार्गानेच नागरिकांना डोंगरदऱ्यातून वाट काढत गावात जावे लागते. अशा स्थितीत गावापर्यंत वीज पुरवठा पोहोचवल्याबद्दल नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार अंडिल, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांचे आभार व्यक्त केले.