गडचिरोली येथे धान पिकात केली मत्स्य शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:34 PM2018-08-11T14:34:51+5:302018-08-11T14:37:19+5:30

देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स्य शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे.

Fishery farmed in paddy crop at Gadchiroli | गडचिरोली येथे धान पिकात केली मत्स्य शेती

गडचिरोली येथे धान पिकात केली मत्स्य शेती

googlenewsNext
ठळक मुद्देआत्माचे मार्गदर्शननैनपूर येथे नाविन्यपूर्ण प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निसर्गाचा लहरीपणा, रोगांचा प्रादुर्भाव, धानाला असलेला अल्प बाजारभाव यामुळे आजच्या घटकेला धानाची शेती परवडणारी नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असतांनाच देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स्य शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे.
यावर्षी एकरी चार लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे शेती परवडणारी नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या शेतकऱ्यांनी नवा आदर्श उभा केला आहे. यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
नैनपूर येथे आत्मा अंतर्गत भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गट तयार करण्यात आला. या गटाने स्वत:साठी नियमावली तयार करुन सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. या गटाचे अध्यक्ष गजेंद्र महादेव ठाकरे तर सचिव शंकर चेंडूजी भाजीपाले आहेत. याच गटातील अन्नाजी तुपट व गजेंद्र ठाकरे यांनी यावर्षी आपल्या प्रत्येकी अर्धा एकरमध्ये सेंद्रिय धान शेतीत मत्स्य शेती करण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा हा प्रयोग नाविन्यपूर्ण असून यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्रव्यवस्थापक महेंद्र दोनाडकर व कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे यांचे सहकार्य लाभत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आत्माकडून ५० हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चौकोनी आकारात चारही बाजूला दीड मीटर खोल व तीन मीटर रुंद खड्डा तयार केला आहे.त्यात रोहु, कथला, शिप्रस जातीच्या माशांचे बिज सोडले आहे. उर्वरित जागेत श्रीपध्दतीने मकरंद जातीच्या धान पिकाची रोवणी केली आहे. धान पिकासाठी पूर्णत: सेंद्रिय खताचा वापर करीत आहेत. माशांना खाद्य म्हणून गोमूत्र, शेण, गुळ, वडाच्या झाडाखालील माती, बेसन, ताक यापासून तयार केलेल्या जिवांमृताचा वापर केला जात आहे. माशांच्या विष्ठेचा धान पिकासाठी उपयोग होत असल्याने धानाच्या वाढीस पोषक ठरत आहे. शेतात सोडलेले मासे ७ ते ८ महिन्यात एक किलो वजनाचे होऊन विक्री योग्य होतात. अर्धा एकर शेतीतून शेतकºयांना बाजार भावानुसार दोन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. धान पीक पूर्णत: सेंद्रिय व सुवासिक असल्याने त्यापासून २० हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

उत्पादन खर्च कमी व उत्पन्न जास्त यामुळे धान शेतीतून मत्स्य शेती हा प्रयोग शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरणारा आहे. सोबतच पुढे शेतावर माशांसाठी खड्डा करुन उपसा केलेल्या मातीपासून तयार झालेल्या पाळीवर शेवगा व आंब्यांच्या झाडांची लागवड करुन उत्पन्न वाढविण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. सदर शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहण्याठी इतर जिल्ह्यातील शेतकरी येथे येत आहेत. आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील १२५ व गोंदिया जिल्ह्यातील १२० शेतकऱ्यांनी भेट देऊन या प्रयोगाची माहिती जाणून घेतली आहे.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज असून शेतीत पूरक उद्योग केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार नाही. अशा प्रकारच्या मिश्र शेतीमुळे उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत होईल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याचे आत्माचे उद्दिष्ट आहे.
- महेंद्र दोनाडकर, तालुका तंत्रव्यवस्थापक देसाईगंज


सेंद्रिय शेती कमी खर्चाची असून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता धानपिका सोबत मत्स्य शेती सारखे नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास शेतकऱ्यांना शेती फायदेशीर ठरेल.
- उमेशचंद्र तुपट, शेतकरी,
भाग्यश्री सेंद्रिय शेती गट नैनपूर

Web Title: Fishery farmed in paddy crop at Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती