रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:37+5:30
यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शुक्रवारी ब्रह्मपुरी विश्रामगृहावर आले असताना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तहसीलअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. ब्रह्मपुरी येथील नाट्यगृह, बारई तलावाचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले. नगर पालीकेच्या २२ कोटी रुपयांच्या नळयोजनेचा आढावा घेतला. तसेच सर्व क्रीडा संकूल पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. सिंदेवाही येथील विश्रामगृह दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वन जमीन पट्टे तसेच विविध ठिकाणच्या आवास योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचे निर्देश देत उपविभागातील तलाठी कार्यालय, त्यांची सद्यस्थिती व निर्मिती संदर्भातही त्यांनी यावेळी आढावा घेतला. असोलामेंढा पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांनाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तिन्ही तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
नुकसान भरपाईचा आढावा
सावली परिसरात पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. असून १२ हजार ८५६ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले असून ७२७२.९० हेक्टरवर नुकसान झाले होते. आतापर्यंत चार कोटीवर यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्यापैकी तीन कोटी ८७ लाख वितरीत करण्यात आले. तर ब्रह्मपुरी तालुक्यात देखील चार हजार ३३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले होते. ३१४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी १ कोटी ९३ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतला.