वाहनासह पाच लाखांची दारू जप्त
By admin | Published: October 19, 2016 02:24 AM2016-10-19T02:24:38+5:302016-10-19T02:24:38+5:30
दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीच्या
पुराडा-रामगड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गडचिरोली : दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी व रविवारी पुराडा-रामगड मार्गावर तसेच कसनसूर येथे सापळा रचून एका दारूविक्रेत्या आरोपीकडून चारचाकी वाहनासह पाच लाखांची दारू जप्त केली.
शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उतपादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसनसूर येथील सुरेश नितलाल दास याच्या घरी धाड टाकून छत्तीसगडनिर्मित गोल्डन गोवा ब्रँडच्या १८० मिली मापाच्या १ हजार २४८ बॉटल्स जप्त करण्यात आल्या. सदर दारूची किंमत १ लाख २४ हजार ८०० रूपये आहे.
१६ आॅक्टोबर रोजी रविवारला पुराडा-रामगड मार्गवर सापळा रचला. दरम्यान सायंकाळच्या सुमारास एमएच-३३-ए-६०७ क्रमांकाचे वाहन येताना दिसले. सदर वाहनाला अडवून झडती घेतली असता, त्यात छत्तीसगड निर्मिती गोवा विस्की ब्रँडच्या १८० मिली मापाच्या १२ पेट्या आढळून आल्या. या दारूची किंमत ५७ हजार ६०० रूपये आहे. तसेच १८० मिलीमापाच्या इप्लेरियल ब्ल्यू ब्रँडच्या तीन पेट्या विदेशी दारू जप्त करण्यात आल्या. याची किंमत २८ हजार ८०० रूपये आहे.
२१ हजार ६०० रूपये किंमतीची मध्यप्रदेश निर्मित किंग फिशर बिअरच्या ९ पेट्या जप्त करण्यात आल्या. वरील दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाहनासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५ लाख ३२ हजार ८०० रूपये इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख करीत आहेत. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क गडचिरोलीचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख, जी. पी. गजभिये, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एम. गव्हारे तसेच व्ही. पी. शेंद्रे, व्ही. पी. महाकुमलकर आदींनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)