पाच रूपयांत २० लिटर शुद्ध पाणी
By admin | Published: June 25, 2017 01:30 AM2017-06-25T01:30:06+5:302017-06-25T01:30:06+5:30
तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सीएसआर निधीतून इंडिया एसएमई अॅसेट
जिल्ह्यातील पहिला प्रकल्प : जामगिरीत सयंत्राचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सीएसआर निधीतून इंडिया एसएमई अॅसेट रिकन्सट्रक्शन कंपनीद्वारा जलशुद्धीकरण सयंत्राची स्थापना करण्यात आली. या सयंत्राचे लोकार्पण आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सदर सयंत्राद्वारे एटीएम कार्ड पद्धतीने जामगिरीवासीयांना पाच रूपयात २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे.
लोकार्पणाप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक विकास पाटील, तुषार वाढई, ग्रामसेवक चराटे, अभिजीत गोंड, अभियंता चंदन पाल, निखील नरड, राजू कांबळे तसेच जामगिरी येथील शरद कोवे, पांडुरंग वाढई, अरूण तलांडे, खुशाल वाढई, शांताराम कोवे, गीता कोवे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
जामगिरी गावात साकारण्यात आलेल्या शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. सदर प्रकल्प पूर्णत्वास आल्याने आता पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर शुद्ध पाण्याचे सयंत्र जामगिरी येथील ग्राम पंचायत कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. यावर ग्राम पंचायतीचे नियंत्रण राहील.