छत्तीसगड सीमेवर पाच नक्षल्यांचा खात्मा; निवडणुकीपूर्वी घातपात कट; चकमकीत जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:43 AM2024-10-22T10:43:02+5:302024-10-22T10:43:31+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश
लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात येथील पोलिसांना सोमवारी यश आले. माओवादी व जवानांत छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात जोरदार चकमक उडाली. यात पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. चकमकीत एक जवान जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करू शकतात, ही शक्यता गृहीत धरून पोलिस अलर्ट मोडवर आहेत. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना जवानांच्या दिशेने माओवाद्यांनी गोळ्या झाडल्या. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.
जवानाला हेलिकॉप्टरने आणले गडचिरोलीत
- यावेळी एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- दरम्यान, मृत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेहही गडचिरोली येथे आणले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
घनदाट जंगलाच्या आश्रयाने घुसखोरी
- माओवाद्यांविरुद्ध महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांच्या आक्रमक मोहिमेमुळे नक्षली सैरभैर झाले आहेत. काहींना अटक झाली, तर काही ठार झाले.
- त्यामुळे नक्षली आता नेतृत्वहीन होत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील नक्षली सीमावर्ती भागातील घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गडचिरोलीत घुसखोरी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन महिला, दोन पुरुषांचा समावेश
मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. कोपरी जंगलात पहाटे सहा वाजल्यापासून चकमक सुरू झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ही चकमक सुरूच होती. त्यानंतर, पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मृत नक्षल्यांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे.