'कोल्ड ब्लडेड मर्डर'! इंटरनेटवर सर्च करून ५ जणांचा काटा काढला, परराज्यातून विष मागवलं; अन्..

By संजय तिपाले | Published: October 18, 2023 02:15 PM2023-10-18T14:15:59+5:302023-10-18T14:22:22+5:30

'त्या' पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूसत्राचा अखेर उलगडा

Five people in the same family in Mahagaon were killed by giving poison through food and water | 'कोल्ड ब्लडेड मर्डर'! इंटरनेटवर सर्च करून ५ जणांचा काटा काढला, परराज्यातून विष मागवलं; अन्..

'कोल्ड ब्लडेड मर्डर'! इंटरनेटवर सर्च करून ५ जणांचा काटा काढला, परराज्यातून विष मागवलं; अन्..

गडचिरोली : आधी पती- पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पद्धतीने २० दिवसांत लागोपाठ पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूने अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) हादरुन गेले होते. अखेर १७ ऑक्टोबरला या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून यामागे 'कोल्ड ब्लडेड मर्डर'ची थरारक कहाणी समोर आली. अन्नपाण्यात विष मिसळून या पाचही जणांना संपविल्याचे समोर आले.  सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले.  

 शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजय शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना अटक केली आहे.  

शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे  यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली.

पाच जणांच्या गूढ मृत्यूने महागाव हादरले, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली.

लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक  मृत्यूची नोंद झाली. पो.नि. मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १८ ऑक्टोरला पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, अनुज तारे, उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड उपस्थित होते.

आणखी तिघांवर उपचार सुरु

सध्या रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व   रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

ना रंग, ना दर्प, इंटरनेटवर शोधले विषारी द्रव

संघमित्रा कुंभारे हिने सुरुवातीला धतुरा नावाचे विषारी द्रव मागवले होते. मात्र, ते पाण्यात मिसळल्यावर हिरवा रंग झाला तसेच दर्पही येत होता. त्यामुळे तिने प्लॅन काही दिवस पुढे ढकलला. इंटरनेटवर सर्च करुन नंतर विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

कोल्ड ब्लडेड मर्डरच्या थरारनाट्यामागे छळ, संपत्तीचा वाद

संघमित्रा ही मूळची अकोला येथील आहे. ती व रोशन हे पोस्ट खात्यात सोबत काम करत. तेथेच त्यांच्यात प्रेम झाले. डिसेंबर २०२२ मध्ये त्या दाेघांनी विवाह केला. ते एकाच जातीचे आहेत, पण प्राध्यापक वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांना पक्षाघात झाला व नंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांना संपविण्याचा कट तिने रचला. रोशनची मामी रोजा रामटेके महागावातच राहते. रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे तिच्या मनातही राग होता. यातून या दोघींनी मिळून संपूर्ण कुुुंटुंबाला जीवे मारण्याचा कट अतिशय थंड डोक्याने आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

नॉनव्हेज, दाळ, पाण्यातून विषप्रयोग

संघमित्रा रोशन कुंभारे व रोजा रामटेके यांनी नॉनव्हेज, दाळीतून तसेच पाण्यात विषारी द्रव मिसळले, ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले. २० दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.

Web Title: Five people in the same family in Mahagaon were killed by giving poison through food and water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.