देसाईगंजमध्ये पाच शाळकरी बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:12 AM2018-02-07T01:12:06+5:302018-02-07T01:15:20+5:30

स्थानिक नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाच शाळकरी बालकांना रस्त्यात गाठून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Five schoolgirls kidnapping attempt in Desaiganj | देसाईगंजमध्ये पाच शाळकरी बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न

देसाईगंजमध्ये पाच शाळकरी बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देव्यापार नगरीत खळबळ : वेळेवर वाहन पोहचू न शकल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला, पोलिसांपुढे शोध घेण्याचे आव्हान

ऑनलाईन लोकमत
देसाईगंज : स्थानिक नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाच शाळकरी बालकांना रस्त्यात गाठून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरील शेतातल्या खोलीत पाच तास कोंडून ठेवल्यानंतर त्यांना तेथून दुसरीकडे हलविण्यापूर्वीच या बालकांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेतली.
सोमवारी (दि.५) घडलेल्या या घटनेची तक्रार रात्री मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी दिवसभर या घटनेचा तपास केला. मात्र सायंकाळपर्यंत कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. चेतन रोशन मेश्राम (वर्ग तिसरा), रामेश्वर मुराज जुमनाके (वर्ग दुसरा) तृणाली विशाल मेश्राम, समीर प्रकाश जुमनाके (वर्ग तिसरा) आणि गौरव नवनाथ पत्रे (वर्ग चौथा) अशी त्या बालकांची नावे आहेत. हे सर्व बालक तुकूम वार्डमधील रहिवासी आहेत. सोमवारी सकाळी १० वाजतादरम्यान ते आंबेडकर-पटेल वॉर्डमधील नगर पालिकेच्या मराठी प्राथमिक शाळेत जाण्यासाठी शॉर्टकट असलेल्या पायवाटेने निघाले होते. अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात चेहऱ्यावर मास्क लावलेल्या ६ जणांनी त्या मुलांना पकडले आणि अनिकेत महाविद्यालयाच्या मागील पटेल यांच्या शेतातील झोपडीत नेले. तिथे त्यांच्या तोंडावर पट्टी बांधून हातपायही बांधून ठेवण्यात आले. काय होत आहे हे न कळल्याने ही मुले चांगलीच घाबरून गेली होती. तब्बल पाच तास त्या मुलांना त्याच अवस्थेत ठेवण्यात आले.
यादरम्यान अपहरणकर्त्यांपैकी एक व्यक्ती कोणाशीतरी फोनवरून वारंवार संपर्क करून गाडी तत्काळ पाठविण्यास सांगत होता. मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत वाहन पोहोचले नसल्यामुळे अपहरणकर्तेही घाबरले. अजून जास्त वेळ तिथे मुलांना ठेवणे जोखमीचे ठरेल असा विचार करून त्यांनी शेवटी त्या मुलांना सोडून दिले. मात्र त्याच वेळी अपहरणकर्त्यांना हवी असलेली गाडी तिथे पोहोचली. त्यामुळे अपहरणकर्त्यांपैकी काही जण पुन्हा त्या मुलांना पकडण्यासाठी धावले. पण मुलांना घराच्या दिशेने धूम ठोकल्याने त्यांच्या हाती लागले नाही. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी भादंवि कलम ३४१, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार सिद्धांत मांडवकर यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक सूरज गोरे अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहे.
राखणदार लग्नात
अपहरणकर्त्यांनी या शाळकरी मुलांना ज्या शेतातील झोपडीत ठेवले होते त्या झोपडीत देसाईगंजच्या भगतसिंग वॉर्डमधील ७० वर्षीय रहिवासी नत्थुजी कोहपरे राहात होते. ते शेताची राखण करतात. परंतू घटनेच्या दिवशी ते आपल्या नातेवाईकांच्या गावाला लग्नासाठी गेले होते. त्याचा फायदा घेत अपहरणकर्त्यांनी पाचही मुलांना त्या झोपडीत पाच तास डांबून ठेवले.
सहा वर्षानंतर पुनरावृत्ती
व्यापारी शहर असलेल्या देसाईगंज शहरात यापूर्वीही अशी घटना घडली आहे. २०१२ मध्ये येथील रेल्वे स्थानकावरून चार बालकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. सहा वर्षानंतर पुन्हा त्याच पद्धतीची घटना घडल्यामुळे शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. हे बालक श्रीमंत घरचे नसताना त्यांचे अपहरण करण्यामागील उद्देश काय? हे कोडे आहे.

Web Title: Five schoolgirls kidnapping attempt in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा