२४ तास विजेसाठी पाच हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह निघाला माेर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 02:45 PM2022-01-25T14:45:16+5:302022-01-25T14:47:42+5:30
कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी देसाईगंजातून माेर्चा काढला.
गडचिरोली : कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी २४ जानेवारी राेजी देसाईगंजातून माेर्चा काढला. तरीही या माेर्च्याला कुरूड व काेंढाळा येथे पाेलिसांनी अडविले. शेवटी माेर्चेकरू पायदळ आरमाेरीच्या दिशेने निघाले; परंतु पाेलिसांनी प्रमुख लाेकांना ताब्यात घेत माेर्चा माेडून काढला.
कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा मिळावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमाेरी विधानसभा क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनाने शेतकरी देसाईगंज येथे एकवटले. त्यानंतर माेर्चेकरू गडचिरोलीच्या महावितरण कार्यालयाकडे निघाले. असता कुरूड फाट्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावून मोर्चा अडविला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कुरूड फाट्यावर दोन तास चक्काजाम केला व पायदळ निघाले. याचवेळी महावितरण कंपनीचे देसाईगंज येथील कार्यकारी अभियंता डोंगरवार यांच्यासह कुरखेडाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे व देसाईगंजचे अभियंता सारवे आदींनी कोंढाळा ते आरमोरीच्यामध्ये माेर्चा थांबवून दोन तास चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. शेवटी पाेलीसबळाने माेर्चा माेडीत काढला. मोर्चात उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, शैलेश चितमलवार, नगरसेवक अशोक कंगाली, अनिल मिसार, अरुण राऊत, चिंटू नाकाडे, तानाजी ठाकरे तसेच कार्यकर्ते व शेतकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
काेंढाळ्यात तीन तास राेखला रस्ता
वेळाेवेळी पाेलिसांनी अडविल्यानंतर कोढाळा येथेसुद्धा शेतकऱ्यांनी तीन तास चक्काजाम आंदाेलन केले. यावेळी शेतकरी खूप आक्रमक झाल्याने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. आंदाेलनकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम, नंदू चावला,विकास प्रधान, विजय पुस्ताेडे यांच्यासह काही शेतकऱ्यांना पाेलिसांनी अटक केली.
पालकमंत्र्यांचे आश्वासन
२४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. काही दिवसातच कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. दरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा गडचिरोली येथे पाेहोचू नये, याकरिता आरमोरी, पाेर्ला तसेच खरपुंडी फाट्यावर चाेख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.