पाच हजार मेट्रिक टन खत पोहोचले

By admin | Published: June 5, 2017 12:34 AM2017-06-05T00:34:41+5:302017-06-05T00:34:41+5:30

२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Five thousand metric tons of fertilizer reached | पाच हजार मेट्रिक टन खत पोहोचले

पाच हजार मेट्रिक टन खत पोहोचले

Next

बियाणेही दाखल : ११ हजार ८६६ मेट्रिक टन साठा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. मागील वर्षी १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये, या उद्देशाने जि.प. च्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार शनिवारी गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार ६६५ मेट्रीक टन खत पोहोचला आहे. याशिवाय धान बियाणेही उपलब्ध झाली आहेत.
धान हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यात खरीपामध्ये धान पिकाची लागवड करण्याचा ओढा कायम आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी पोषक आहे. धान पिकाच्या दृष्टीने प्रत्येक गावात मामा तलाव, बोड्यांची बांधणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. असे असतानाही दरवर्षी धान पिकाच्या लागवडीमध्ये वाढ होत आहे. २०१६-१७ मध्ये १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या हे प्रमाण १२१ टक्के आहे. २०१७ च्या खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कृषी केंद्राकडे जवळपास सहा हजार ४०० मेट्रीक टन खत गतवर्षीचा शिल्लक होता. आता जुना व नवा मिळून एकूण ११ हजार ८६६ मेट्रीक टन इतका खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. यामध्ये युरीया, डीएपी, एसएसपी, एमओपी, संयुक्त खते आदींचा समावेश आहे. सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जि.प.च्या कृषी विभागाने कृषी आयुक्तालय कार्यालयाकडे एकूण ५० हजार १४० मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. शासनाकडून ५४ हजार ७०० मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आली आहे. गतवर्षीचा ६ हजार ४०० मेट्रीक टन खतसाठा उपलब्ध आहे व यंदा नव्याने पहिल्या टप्प्यात शनिवारी ५ हजार ६६२ मेट्रीक टन खत पोहोचला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाभरातील कृषी केंद्रांकडे एकूण ११ हजार ८६६ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात चंद्रपूर येथून खताची दुसरी रॅक पोहोचणार आहे. येत्या १०-१२ दिवसात संपूर्ण ५४ हजार ७०० मेट्रीक टन खताचा साठा गडचिरोली जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने जि.प.च्या कृषी विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. कृषी केंद्रातून खत व बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

७ हजार ७६६ क्विंटल बियाणे उपलब्ध
यंदाच्या खरीप हंगामासाठी जि.प.च्या कृषी विभागाने १६ हजार ७३९ बियाणे आवश्यक असल्याचे नियोजन केले आहे. कृषी आयुक्तामार्फत बियाण्यांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक खासगी मिळून आतापर्यंत धान व इतर सर्व पिकांचे मिळून एकूण ७७६६.९३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ७६९०.५० क्विंटल धान बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. याशिवाय सोयाबिन ५० क्विंटल, तूर २२ क्विंटल, कापूस ४.२३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आणखी धान बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्यातील कृषी केंद्रात लवकरच होणार आहे. आवश्यकत्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांना दिल्या आहेत.

बियाणे व खतांचा तुटवडा पडणार नाही
यंदाच्या खरीप हंगामासाठी धान व इतर पिकांची बियाणे पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात कृषी केंद्रामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठाही विहीत वेळेत जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात बियाणे व खतांचा तुटवडा जाणवणार नाही, अशी माहिती जि.प.चे कृषी अधिकारी एस. टी. पठाण यांनी दिली आहे.

Web Title: Five thousand metric tons of fertilizer reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.