आविका संस्थांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:07 AM2019-06-08T00:07:43+5:302019-06-08T00:08:25+5:30
कुरखेडा व कोरचीसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलबिंत आहेत. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा व कोरचीसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलबिंत आहेत. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही. सध्या आविकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी आविका पदाधिकारी, कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने आ. कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आविका पदाधिकारी, कर्मचारी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आ. कृष्णा गजबे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात, आदिवासी संस्थेचे २०१५-१६ या वर्षातील २० टक्के कमिशन संस्थेला द्यावे, २०१७-१८ या वर्षातील २ टक्केपेक्षा कमी घटतूट असलेल्या संस्थेचे ५० टक्के कमिशन त्वरित द्यावे, संस्थेचे २००९-१० ते २०१७-१८ पर्यंतचे प्रति क्विंटल १ प्रमाणे साठवणूक भाडे देण्यात यावे, संस्थेच्या खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाची उचल महामंडळाने ८ ते १० महिन्यानंतर केल्यामुळे उघड्यावरील धानाची अवाजवी तूट येते. त्यामुळे संस्थाना आर्थिक नुकसान होते. धान साठवणुकीच्या कालावधीत आधारित तूट मंजूर करावी, २ टक्के घट ही ग्राह्य धरु नये, आदिवासी संस्थेचे २००९-१० ते २०१४-१५ या कालावधीचे अवाजवी तुटीपोटी राखुन ठेवलेले खरेदी कमिशन संस्थेला द्यावे, तसेच आदिवासी संस्थेचे धान खरेदीचे कमिशन प्रति क्विंटल ७० रुपये करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश होता.
निवेदन देताना कृऊबासचे संचालक तथा आविका उपाध्यक्ष विनोद खुणे, देलनवाडीचे उपसभापती रत्नाकर धाईत, पदाधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव माधव तलमले सहसचिव भाऊराव घोडमारे, कोषाध्यक्ष हेमंत शेंदरे, संचालक महादेव मेश्राम, देलनवाडी सोसायटीचे अध्यक्ष बी. आर. पदा व आविका संस्था संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिवेशनात मांडणार समस्या
आविका संस्थांच्या बळकटीसाठी त्वरीत प्रयत्न करावे अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये व पदाधिकारी यांनी केली असता, आ. कृष्णा गजबे यांनी आविकाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असून या अधिवेशनात सदर समस्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.