शेवटच्या दिवशी आरमोरीत नामांकनासाठी इच्छुकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:31 AM2019-01-10T01:31:35+5:302019-01-10T01:31:59+5:30
आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली. नामांकन दाखल करण्याच्या कालावधीत (दि.२ ते ९) नगराध्यक्षपदासाठी एकूण १० तर नगरसेवकपदासाठी १३९ नामांकन दाखल झाले आहेत.
शेवटच्या दिवशी (दि.९) दुपारी ३ वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १०० उमेदवारांनी तहसील कार्यालयात नामांकन दाखल केले. त्यात विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता.
दि.१० ला सर्व नामांकनांची छाननी होईल. त्यातून नामांकन वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दि.१७ पर्यंत मुदत राहणार असून त्यानंतर दि.२७ ला मतदान होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण बदलाबाबत न्यायालयाकडून दखल घेण्यात न आल्याने अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे.
नगराध्यक्षपदासाठी यांचे नामांकन
एसटी प्रवर्गासाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पवन दिलीप नारनवरे, काँग्रेसकडून तेजेश श्रीराम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद यादवराव सोनकुसरे, बहुजन समाज पार्टीकडून विनोद बळीराम वरठे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून कोमल गोविंदा ताडाम, शिवसेनेकडून आकाश रामकृष्ण मडावी आणि इतर अपक्षांंनी नामांकन दाखल केले आहे.
न्यायालयीन याचिका खारिज?
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका याचिकेवर दि.८ तर दुसरीवर दि.९ ला अंतिम सुनावणी होती. मात्र या याचिकांमधील दावा फेटाळून उच्च न्यायालयाने त्या याचिका खारिज केल्याची चर्चा शहरात सुरू होती. संबंधित याचिकाकर्त्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.