एसटी कार्यशाळेच्या छतातून गळते पाणी
By admin | Published: July 13, 2016 02:12 AM2016-07-13T02:12:31+5:302016-07-13T02:12:31+5:30
येथील कार्यशाळेच्या छतावर टिनाचे पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र या टिनाच्या पत्र्यांमधून पाणी गळत असल्याने कार्यशाळेत पावसाचे पाणी जमा झाले आहे.
एसटी विभागाचे दुर्लक्ष : बस दुरूस्तीचे काम करताना कर्मचाऱ्यांना अडचण
गडचिरोली : येथील कार्यशाळेच्या छतावर टिनाचे पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र या टिनाच्या पत्र्यांमधून पाणी गळत असल्याने कार्यशाळेत पावसाचे पाणी जमा झाले आहे. हेच पाणी बाजुच्या कार्यालयामध्येही जात असल्याने कार्यालयामधील कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली आगारात एकूण ९३ बसेस आहेत. या बसेसची देखभाल करण्याबरोबरच किरकोळ दुरूस्तीचे काम केले जाते. यासाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस स्वतंत्र शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्येच कार्यशाळेचे काम केले जाते. शेडच्यावर टिनपत्रे टाकण्यात आले आहेत. यातील काही टिनपत्रे जुने असल्याने त्यांच्यावर छिद्र पडले आहेत. तसेच आळ्याच्या मधील बाजुचे टीन सरकले असल्याने त्यांच्यामधून पावसाचे पाणी कार्यशाळेमध्ये गळते. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणी जमा झाले होते. याच ठिकाणी एसटी दुरूस्तीचे काम केले जाते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी खाली जमा झाल्याने काम करणे कठीण होत आहे. बरेचसे एसटीचे काम खाली झोपून करावे लागते. अशातच फरशीवर पाणी राहत असल्याने काम कसे करावे, असा प्रश्न एसटी कामगारांसमोर निर्माण झाला आहे. एसटी दुरूस्त करण्याचे साहित्यही या ठिकाणी राहते. सदर साहित्यसुद्धा पावसाच्या पाण्याने खराब होण्याची शक्यता आहे.
याच इमारतीत एका खोलीमध्ये कार्यालय आहे व दुसऱ्या खोलीमध्ये आगार व्यवस्थापकांचे कक्ष आहे. कार्यालयामध्ये एसटीचे महत्त्वाचे दस्तावेज आहेत. या कार्यालयात जवळपास १० ते १५ कर्मचारी काम करतात. मात्र पावसाच्या पाण्यामुळे या कार्यालयातही ओलसरपणा राहते. कर्मचारीही त्रस्त आहेत. त्यामुळे आगार प्रशासनाने तत्काळ सदर शेड दुरूस्त करावा, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)