शेडनेटद्वारे फुलविली शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:49 PM2017-10-21T23:49:06+5:302017-10-21T23:49:17+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेडनेट उभारून दुर्गम भागातील ताटीगुडम येथील एका आदिवासी शेतकºयाने आपल्या शेतजमिनीत....
विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेडनेट उभारून दुर्गम भागातील ताटीगुडम येथील एका आदिवासी शेतकºयाने आपल्या शेतजमिनीत विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करून आपली शेती फुलविली आहे. शेडनेटच्या माध्यमातून यंदाच्या खरीप हंगामात लाख रूपयांचे उत्पन्न मिळविणार असल्याचा विश्वास या प्रगतशील शेतकºयाने व्यक्त केला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर भाजीपाला पिकांसाठी शेडनेट पुरविले जाते. या योजनेचा ताटीगुडम येथील शेतकरी मल्लेश पोचा सिडाम यांनी लाभ घेतला. खरीप हंगामाच्या सुरुवातीला सिडाम यांनी आपल्या एकूण हेक्टर क्षेत्रापैकी ५०० चौ.फूट क्षेत्रावर शेडनेट उभारले.सिडाम यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. सिडाम हे यापूर्वी सदर शेतीमध्ये केवळ धानपिकाचे उत्पादन घेत होते. मात्र आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या आधारावर सिडाम या शेतकºयाने अतिदुर्गम भागात हरितक्रांती केली, असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. सिडाम यांनी शेडनेट उभारून मिरची, वांगे, टमाटर, दोडका, भोपळा व विविध प्रकारचे फूल, पालेभाज्या लावल्या आहे.
सदर योजनेचा लाभ चंद्रा येथील शेतकरी मुसली बग्गा वेलादी याने सुद्धा घेतला आहे. शिवाय कोरेली बुजच्या वाले कोच्चा कुळमेथे, ताटीगुडम येथील रामभाई मलय्या आत्राम, गंगाराम विस्तारी मडावी यांनीही सदर योजनेच्या अनुदानातून आपल्या शेतात शेडनेट उभारून भाजीपाला पिकाच्या शेतीस वाव दिला आहे. कमी जागेत उत्तम व गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेण्यासाठी या शेडनेटचा उपयोग शेतकºयांना होत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अनुदानातून मिळणाºया शेडनेट या योजनेबाबत अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात आली. अहेरी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला असून ते आता विविध प्रकारचे पिके या शेडनेटच्या आधारे घेत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी या शेतकºयांना मार्गदर्शन करतात.
- सचिन पानसरे, तालुका कृषी अधिकारी, अहेरी