पूरपीडित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 AM2021-04-08T04:37:40+5:302021-04-08T04:37:40+5:30
मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने महापुरामुळे नदीकाठावरील १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त ...
मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने महापुरामुळे नदीकाठावरील १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन पूरबाधित होऊन उभी पिके नेस्तनाबूत झाली. गोसे खुर्द प्रकल्पातील संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापूर आला. याचा फटका नदीकाठावरील पिकांना बसला. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई म्हणून १८ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले होते.
दरम्यान, पंतप्रधान विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानापोटी ३९ हजार रुपये प्रति हेक्टर विमा कंपन्यांकडून प्राप्त होतील, अशी अपेक्षा होती; मात्र जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या तुलनेत शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. कोंढाळा येथील अनेक शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून पूरपीडित शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.